court rejected the report of the police in the rape case against Mehboob Sheikh | मेहबूब शेख यांच्या विरोधातील बलात्कार प्रकरणात पोलिसांना धक्का; न्यायालयाने अहवाल फेटाळत सांगितलं... | Loksatta

मेहबूब शेख यांच्या विरोधातील बलात्कार प्रकरणात पोलिसांना धक्का; न्यायालयाने अहवाल फेटाळत सांगितलं…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

मेहबूब शेख यांच्या विरोधातील बलात्कार प्रकरणात पोलिसांना धक्का; न्यायालयाने अहवाल फेटाळत सांगितलं…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला ‘बी समरी अहवाल’ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला. “या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला आहे. तसेच तक्रारदारालाच या प्रकरणात खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून या प्रकरणात आता सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी तपास करावा. त्यात पोलीस आयुक्तांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे”, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या बी समरी अहवालात सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी योग्य ते पुरावे जोडलेले नसून स्वीकारणे योग्य नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा, असे न्यायालयात सांगितले.

सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी अ‍ॅड. आय. डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित असून औरंगाबादेतील बायजीपुरा भागात भाड्याने राहते. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. मात्र, तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आरोप मेहबूब शेख याने समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले होते. पोलिसांनी तपास करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून पीडिता आणि आरोपी यांची भेट झाल्याबद्दलही शंका उपस्थित केली होती.

“वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” चित्रा वाघ यांचं ट्वीट चर्चेत

सीसीटीव्हीतही दोघे कुठे भेटल्याचे दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले होते. त्यावरून पोलिसांकडून बी समरी अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने वरील मुद्दे उपस्थित करून फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे हे प्रकरण आले, तेव्हा न्यायालयानेही पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले होते. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2021 at 21:47 IST
Next Story
मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा