राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी कमी होताना दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असतानाच, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबतही सतर्क केले जात आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्यी ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ७ हजार ३३२ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ६ हजार २६९ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, आज २२४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२९,८१७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६६,४४,४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५८,०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२७,७५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९३,४७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून करोना लस देणार?; एम्स प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले…

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाचा प्रभाव काही कमी झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचं लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून लस देण्याची शक्यता आहे.