भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलं अआहे. करोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं अशा शब्दांत त्यांनी टीका करत नाराजी जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्यासाठी सगळं खापरं करोनावर फोडायचं आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी सेना राबवत आहे, हे अत्यंत निंदनिय आहे,” अशी टीका नितेश राणे यांनी पत्रातून केली आहे.

“दवाखान्यात लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघाले. परंतु अशाही प्राप्त परिस्थितीत पहिल्या फळीतील कर्मचारी, कोविड योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या नशिबी मात्र आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.

“आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलनं करावी लागली. सरकार साधं विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकलं नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या. ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पुर्ण करता आलेला नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “२६ जानेवारीपासून मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही. करोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे दोन डोस झालेले नाहीत! ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे”.

“आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम महापालिकेने हाती घेतल्यानंतर ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण झाले. यातील फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जणांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे. मुंबई महानगर पालिका आपल्याचं कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोंधळच दर्शवतो,” असं नितेश राणेंनी निदर्शनास आणून दिलं आहे.

“कालच आपण महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळात करोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली. पण मला खात्री आहे की ही वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असेल. म्हणूनच मी हे वास्तव आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छितो. जेणेकरून महानगर पालिकेचे फ्रंटलाईन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना संशय निर्माण ना होवो की ठाकरे सरकार हे त्यांच्यासोबत संधीसाधूपणाचं राजकारण तर करत नाही ना?, असं नितेश राणे पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 bjp nitesh rane letter to shivsena aditya thackeray sgy
First published on: 30-11-2021 at 09:34 IST