महाराष्ट्रात लॉकडाउन वाढणार?; उद्धव ठाकरे आज साधणार राज्यातील जनतेशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता फेसबुक लाईव्ह करत साधणार राज्यातील जनतेशी संवाद

संग्रहीत छायाचित्र

महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन वाढवणार असून निर्बंध थोड्या प्रमाणात शिथील केली जातील असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री यासंबंधी अधिकृत माहिती देतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ .३० वाजता राज्यातील जनतेसोबत संवाद साधणार असून यावेळी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

लॉकडाउन वाढणार असला तरी तो किती दिवसांसाठी वाढणार आहे याबाबत स्पष्टता नाही. महाराष्ट्रात लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथील केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच नेमके कोणते निर्बंध शिथील केले जाणार आहेत याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. काळी बुरशी तसंच तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने काय निर्णय घेतला आहे हे उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतरच स्पष्ट होईल.

राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल

करोनाची साखळी तोडण्यासाठी ५ एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकानं बंद आहेत. १४ एप्रिलच्या रात्रीपासून राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने लॉकडाउन उठवण्याची मागणी होत आहे. व्यापाऱ्यांनी १ जूनपासून दुकाने उघडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, सरकार कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. आरोग्य विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील करोनास्थितीवर सादरीकरण करताना, २१ जिल्ह्यांतील रुग्णवाढ राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असून, १०-१५ जिल्ह्यांत रुग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आणलं.

Maharashtra Lockdown: लॉकडाउन किती दिवसांसाठी वाढणार?; राजेश टोपेंनी दिली माहिती

२१ जिल्ह्यांत फैलाव कायम असून, म्युकरमायकोसिसच्या संकटाचा धोका लक्षात घेऊन लॉकडाउनमध्ये १५ दिवस वाढ करण्याबाबत गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली. काही निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा वाढविण्यासह अन्य काही सवलती देण्याचा प्रस्ताव आहे. उपनगरी रेल्वे प्रवासावरील निर्बंध मात्र कायम राहतील.

मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेतून सर्वसामान्य प्रवाशांना आणखी महिनाभर तरी प्रवास करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता नाही. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासास मुभा आहे. यात आणखी कोणत्या घटकांना परवानगी दिली जाणार नाही. रेल्वे परवानगीबाबत १५ जूनपर्यंत तरी विचार होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 lockdown maharashtra chief minister uddhav thackeray to address the state sgy

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या