Maharashtra Lockdown : राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम!; काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करणार

”जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे” असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

संग्रहीत

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. तर, राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी उद्या संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. ”जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे.” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम राहातील असे जाहीर केले. तसेच,  जिल्ह्यांमधील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यांमध्ये कदाचित निर्बंध शिथील केले जातील असं देखील सांगितलं.

तसेच, सुरूवातीला त्यांनी, जिद्दीनं आणि निश्चयानं बंधनं पाळल्याबद्दल धन्यवाद.. असं म्हणत जनतेचे आभारही मानले. याचबरोबर, आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. असंही ते म्हणाले. याशिवाय, तौते वादळग्रस्तांना मदत देण्यास सुरूवात होत असल्याचंही सांगितलं.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”काहीजण असं म्हणत आहेत की लाट आता ओसरत आहे, मग आता काय करणार हे निर्बंध उठवणार का? याबाबत देखील तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता वाटते, की नेमकं आपण कुठं आहोत? आज राज्यात १८ हजारांच्या आसपास रूग्ण संख्या आहे. मात्र दोन-चार दिवसांअगोदरचा आकडा पाहिला तर, गेल्या लाटेत जी सर्वोच्च संख्या होती. तिच्या तुलनेत आता थोडीशी कमी होते आहे. त्यावेळी आपण जे शिखर गाठलं होतं. ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं. यंदा ही परिस्थिती सणासुदीच्या अगोदर आलेली आहे. १७ ते १९ सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात साधारण एका दिवसात आढळणारी रूग्ण संख्या ही २४ हजार होती. आता २६ मे रोजी २४ हजार ७५२ एवढे रूग्ण आढळलेले आहेत. आज साधारण ही संख्या १८ हजारापर्यंत आली आहे. म्हणजे अजूनही आपण म्हणावं तेवढं खाली आलेलो नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे यावेळी रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. मात्र आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रूग्ण संख्या थोडीशी वाढताना दिसत आहे. ही जरा काळजीची बाब आहे. कारण, शहरी भागात हे प्रमाण कमी होताना दिसत असलं तरी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे ताबतोब थांबणं आवश्यक आहे.”

याचबरोबर  ”ही दुसरी लाट ही अपेक्षेपेक्षा फार मोठी होती. या लाटेत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत. यापुढे मात्र असं होऊ देता कामानये. करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच पालकत्व राज्य सरकार घेणार. त्यांना आम्ही अनाथ होऊ देणार नाही. याबाबत योजना तयार केली जात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील निर्बंध नाइलाजाने पुढील १५ दिवस म्हणजे १५ जूनपर्यंत वाढवावे लागत आहे. नुसते निर्बंध वाढवत नाही आहोत, तर आता आपण जिल्ह्यानुसार आढावा घेऊन, काही जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध कदाचित कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यात हे निर्बंध आपण थोडेफार शिथील करू शकू. मात्र निर्बंध जरी शिथील होत असले तरी धोका टळला असं समजू नका” असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Corona Lockdown: राज्यात नवे नियम जाहीर; नेमके निर्बंध काय?

तसेच, ”मला पूर्णपणे माहिती आहे की हे संकट फार विचित्र आहे. नुसतं हे संकट आता कमी झालं म्हणून घाई-गर्दीने रस्त्यावर उतरू नका. पण जर का रस्त्यावर उतरणार असाल, तर मी म्हणेन करोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरा. करोना दूत म्हणून उतरू नका. करोनाची साथ हा सरकारी कार्यक्रम नाही. ही सरकारी योजना नाही, की जिच्या विरोधासाठी तुम्ही रस्त्यावर उतराल.. असा जर का आपल्या मनात विचार असेल तर तो डोक्यातून काढून टाका.” असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 maharashtra cm uddhav thackeray facebook live lockdown extension msr

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या