करोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. मागील अनुभव पाहता सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनेही विदेशी प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली असून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. दुससरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केंद्राच्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या सर्व घडामोडींदरम्यान १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याने पालक चिंतेत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून

विमान प्रवाशांची चाचणी ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय; टाळेबंदी टाळण्यासाठी बंधने गरजेची

राजेश टोपे यांना १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागण झालेली कुठे दिसत नाही. त्यामुळे एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला सुरु होईल”.

मुख्यमंत्र्यासोबत बैठक

मास्क वापरणं गरजेचं आहे असं सांगत ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरियंटपेक्षा ५ पटीने जास्त आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. यापुढे केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना थेट विमानतळावर क्वारंटाईन केलं जाणार असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील असंही टोपे यांनी सांगितलं. मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचं असेल तरीही RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

विमान प्रवाशांची चाचणी ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच ओमिक्रॉन नावाचा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. टाळेबंदी नको असेल तर सर्व बंधने पाळावी लागतील, असे सांगत विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणेला दिला.

आफ्रिकेहून दिल्लीमार्गे मुंबई व तेथून कल्याणला आलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यास कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. ओमिक्रॉनच्या धोक्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर सतर्कतेचा आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी करोना विषाणूच्या या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बठक घेतली. या वेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

करोनाच्या ओमिक्रॉन या विषाणूचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर टाळेबंदी परवडणारी नाही. त्यामुळे परत टाळेबंदी लागू द्यायची नाही या निर्धाराने नियमित मुखपट्टी वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लशीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.