करोना संसर्ग वाढताच टप्प्याटप्प्याने निर्बंध लागू

बीड : करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असून मंगळवारी नवीन २११ रुग्णांची नोंद झाली आहे. तीन तालुक्यांतील निर्बंध कडक केलेले असतानाच आता शिरूर कासार तालुक्यातही निर्बंध लागू करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने नियम कठोर केले आहेत. सवलतीच्या वेळेव्यतिरिक्त दुकाने, हॉटेल्स उघडी ठेवणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.

बीड जिल्ह्यात मंगळवारी ३ हजार ५७९ तपासणी अहवालात २११ रुग्ण आढळले आहेत. आष्टी तालुक्यात सर्वाधिक ४३, शिरूर कासार ४२, बीड ३६, पाटोदा २८, अंबाजोगाई, केज प्रत्येकी दहा, गेवराई १४, माजलगाव, धारूर प्रत्येकी पाच तर वडवणी तालुक्यात १७ रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात एकाच वेळी पंधरा ते वीस बाधित रुग्ण आढळत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीणमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले असून प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.  शिरूर कासार तालुक्यातील रुग्णवाढ कायम असल्याने जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी २२ जुलैपासून कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ ते दुपारी चार या वेळेऐवजी सकाळी ७ ते दुपारी साडेबारापर्यंतची वेळ दुकाने उघडण्यासाठी देण्यात आली आहे. संसर्ग वाढत असल्याने इतर तालुक्यांमध्येही टप्प्याटप्प्याने निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये निर्बंध कडक केल्यामुळे अन्य तालुक्यांतील नागरिकांमध्येही टाळेबंदी विषयी भीती निर्माण होऊ लागली आहे. रुग्णांचा आकडा वाढत राहिल्यास निर्बंध कठोर करावेच लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. बाजारपेठेत गर्दी वाढत असल्याने नगरपंचायत, नगरपालिका आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार शिरीष वमने यांनी स्वत: रस्त्यावर उतरून नियम मोडणाऱ्याविरुद्ध दंडाचा बडगा उगारला आहे. कपिलधार (ता. बीड) यासह अन्य तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळी पोलीस आणि महसूलचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पर्यटकांसह भाविकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.