“करोनामुळे तुमचा मुलगा गेला,” घरी बसलेल्या मुलाच्या मोबाइलवर रुग्णालयाचा फोन; महिलेसह कुटुंब हादरलं

करोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या तरुणाला करोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली

COVID-19 Satara Hospital, COVID-19 Satara Hospital Mismanagement
पूर्ण बरा झालेल्या तरुणाला करोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली

करोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या युवकाला त्याचा करोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने तरुणासह कुटुंबीयांना धक्काच बसला. साताऱ्यातील फलटण शहरात ही घटना घडली आहे. सिद्धांत मिलिंद भोसले (वय २०) असं या तरुणाचं नाव असून फलटण शहरातील मंगळवार पेठेत तो राहतो. गेल्या महिन्यात त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत आहे.

कोविडने निधन झाल्याची फोनवरुन माहिती

सोमवारी(७ जून) सिद्धांत घरीच असताना त्याच्या मोबाइलवर फोन आला. त्याने फोन घेतला असता पलीकडून बोलणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बातमी कळवली. हे ऐकून सिद्धांतला काही सुचेना. त्याने ‘हे बघ काय सांगताहेत’ असे म्हणत आई सपना भोसले यांना फोन दिला. त्यांनाही तोच निरोप देण्यात आला. आपला मुलगा समोर असताना हे काय अभद्र निरोप देत आहेत, असे म्हणत त्याच्या आईने थेट सरकारी रुग्णालय गाठले. त्यानंतर तेथील आरोग्य कर्मचा-यांनी आम्हाला आलेल्या यादीप्रमाणे निरोप देण्याचे काम केले आहे, असे सांगत हात वर केले. पण यामुळे भोसले कुटुंबाला मात्र मोठा धक्का बसला आहे.

जिवंत मुलाला मृत घोषित करण्याच्या या प्रकारामुळे भोसले कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सिद्धांतच्या आईने ‘लोकसत्ता शी बोलताना केली.

आणखी वाचा- रायगडात करोनाची दुसरी लाट जास्त व्यापक

जिवंत व्यक्तीला मृत घोषित केले

साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी या प्रकारावर प्रकाश टाकला. ‘लोकसत्ता शी बोलताना ते म्हणाले, जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून सातारा जिल्हा आरोग्य यंत्रणेने मोठा धक्का दिला आहे. आजपर्यंत साडेतीन हजारांहून अधिक लोकांचे करोनाने मृत्यू झाले आहेत. हे आकडे तरी बरोबर आहेत का? की हे आकडेही फुगवलेले आहेत. यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे. याचा जिल्हा प्रशासनांने पर्दाफाश करावा, अशी मागणीही तिकुंडे यांनी केली.

मृत व्यक्तीचे नाव असणारी यादी आम्हाला साताऱ्यातून आली. यादीत नाव आणि माहिती दिसल्यामुळे आमच्याकडून संबंधितांना फोन गेला. यामध्ये नेमकं काय झालं याबाबत वरिष्ठांना कळवण्यात येईल, असे फलटणच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी शितल सोनवलकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 satara district hospital mismanagement informs death of alive person sgy

ताज्या बातम्या