मुंबई : राज्यात बुधवारी एका दिवसात २ हजार ७०१ नवीन करोना रुग्ण आढळले. ही वाढ ३० टक्के आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाली.

राज्यातील करोना संसर्ग वेगाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेखही उंचावत आहे. मंगळवारी राज्यात १ हजार ८८१ नवे रुग्ण आढळले होते, तर दुसऱ्या दिवशी बुधवारी एका दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या २ हजार ७०० वर गेली. बाधितांचे प्रमाणही वाढून सुमारे ६ टक्क्यांवर गेले.

प्रादुर्भाव वाढत असला तरी रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण अत्यल्पच आहे. राज्यात सलग तीन दिवस एकाही मृत्यूची नोंद नाही.

राज्यात एकीकडे रुग्णसंख्या वाढ होत असली तरी त्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची  संख्याही वाढत आहे. बुधवारी राज्यात १ हजार ३२७ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यात सध्या ९ हजार ८०६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

यात सर्वाधिक ७ हजार रुग्ण मुंबईत, तर त्या खालोखाल ठाण्यात १ हजार ४८२, पुण्यात ६५०, रायगडमध्ये २५३ आणि पालघरमध्ये १८१ रुग्ण आहेत.

मुंबईत १ हजार ७६५ नवीन रुग्ण

*मुंबई : शहरात बुधवारी १ हजार ७६५ करोनाबाधित आढळले. यामधील ८३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ११ रुग्ण ऑक्सिजन खाटांवर असल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली.

* सोमवारी ६७६ नवीन रुग्ण आढळले होते. तर मंगळवारी ही संख्या १ हजार २४२ होती. हा आलेख बुधवारी आणखी वाढआ असून ही संख्या १ हजार ७६५ पर्यंत पोहोचली. यामध्ये १ हजार ६८२ रुग्णांना लक्षणे नाहीत.

* मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण सात हजार आहेत. पालिकेकडून चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली असून बुधवारी १९ हजार १८५ चाचण्या करण्यात आल्या. शहरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के

एवढा कायमच आहे. संसर्गाचा वेग अधिक असला तरी  असले तरीही सध्या एकही झोपडपट्टी, चाळ तसेच इमारत प्रतिबंधित नाही. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ८ हजार ३५३ जणांचा शोध घेण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात ४४० नवे बाधित

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी ४४० नवीन करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.  ४४० नवीन रुग्णांपैकी नवी मुंबई १८६, ठाणे १४०, मीरा – भाईंदर ५४, कल्याण -डोंबिवली ३०, ठाणे ग्रामीण २०,  बदलापूर पाच, भिवंडी तीन आणि उल्हासनगर पालिका क्षेत्रात दोन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांनी झपाटय़ाने वाढ होत असल्याने चिंता  व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून पालिका क्षेत्रांमध्ये तसेच ग्रामीण क्षेत्रामध्ये नव्याने १० हजार लिटर क्षमतेच्या प्राणवायूचा साठा करणाऱ्या १४ टाक्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील करोना रुग्णालयांना सज्ज राहण्याबरोबरच रुग्णखाटांची संख्या वाढविण्याचे काम जिल्हा आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले. जिल्ह्यात प्रतिदिन २५० ते ४०० रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी अधिक संख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रातील आहे. तसेच जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १ हजार ४०२ इतकी आहे.