राज्यातील करोना संसर्गाचे वेग कमी झालेला दिसत असला, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. मागील काही दिवस सातत्याने राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही अधिक आढळून आलेली असताना, आज दिवसभरात राज्यात करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत जास्त दिसून आली आहे. राज्यात दिवसभरात ९ हजार १९५ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ८ हजार ६३४ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे निर्बंध जरी शिथिल झालेले असले तरी, नागरिकांनी करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे यावरून दिसत आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,२८,५३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आज २५२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१८,७५,२१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,७०,५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,२८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१६,६६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.