CP Radhakrishnan Maharashtra New Governor : ज्येष्ठ भाजपा नेते सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल असून ते आता महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची जागा घेतील. तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त केली जाणार आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी सायंकाळी यासंबंधीचे आदेश जारी के आहेले. त्यानुसार १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती होणार आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होत आहे. आगामी निवडणूक आता त्यांच्या देखरेखीखाली होणार आहे. दुसऱ्या बाजूला झारखंडमध्ये सी. पी. राधाकृष्णन यांच्या जागी भाजपाचे वरिष्ठ नेते संतोष कुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री अनेक राज्यांमधील राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन? राधाकृष्णन हे गेल्या तीन दशकांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते भाजपाच्या तिकीटावर दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "चुकीच्या पक्षातील चांगला माणूस" सी. पी. राधाकृष्णन यांचा दक्षिण भारतातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांमध्ये उल्लेख केला जातो. तमिळनाडू, केरळसह दक्षिण भारतात भाजपाला मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते गेल्या पाच दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपासाठी काम करत आहेत. तमिळनाडू व केरळमध्ये भाजपाचा फारसा प्रभाव नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन राज्यांमधील जनतेने भाजपाला सपशेल नाकारलं आहे. तरीदेखील इतक्या वर्षांपासून राधाकृष्णन हे दक्षिण भारतात भाजपासाठी काम करत आहेत. तमिळनाडूतील त्यांचे विरोधक त्यांना 'चुकीच्या पक्षातील चांगला माणूस' असं म्हणतात. अवघ्या १८ महिन्यांमध्ये महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत. (PC : FB/ C P Radhakrishnan) हे ही वाचा >> "जिथे कोणीच जात नव्हतं तिथे…", राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्तीनंतर हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य; म्हणाले, "पंतप्रधानांनी मला…" वयाच्या १६ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. गेल्या पाच दशकांपासून ते संघासाठी काम करत आहेत. ते दोन वेळा खासदार राहिले आहेत. दिड वर्षांपूर्वी पक्षाने त्यांना झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हा काहींनी म्हटलं की, संघाची व भाजपाची इतकी वर्षे सेवा केल्यानंतर त्या सेवेचं फळ म्हणून पक्षाने त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तर, काहींच्या मते राधाकृष्णन व तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्यातील मतभेदांमुळे पक्षात दुफळी माजू शकते, या भीतीने पक्षाने त्यांना राज्याबाहेरची जबाबदारी दिली.