कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा भाकपने दिला आहे. याआधी माकप व समविचारी पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मोर्चा काढून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे वितरण शुक्रवारी दुपारी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या पाश्र्वभूमीवर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आंदोलनाची तयारी केली आहे. भाकपच्या जिल्हा शाखेच्या बैठकीत गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्यास आणि त्यामागील सूत्रधाराला त्वरित अटक करावी, असा ठराव करण्यात आला. पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविले जाणार असल्याचे भाकपचे जिल्हा सचिव राजू देसले यांनी सांगितले. २ मार्च रोजी तालुकास्तरावर आंदोलने केली जाणार आहेत. पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी यासाठी धरणे आंदोलन केले जाणार आहे. सामाजिक अत्याचार प्रतिबंध कृती समितीतर्फे ११ मार्च रोजी मुंबई येथे राज्यव्यापी निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.