सांगली : करमणूकप्रधान पिढी तयार झाली तर समाज विनाशाच्या खाईत लोटला जाईल. म्हणूनच इथून पुढच्या काळात ज्ञानाधिष्ठित पिढी निर्माण करण्यासाठी लोकांच्यात विशेषत: खेडय़ातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे असे मत प्रा. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले. सांगली येथील शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित सरपंचासाठी आयोजित केलेल्या क्षमता बांधणी प्रशिक्षिण कार्यक्रमात प्रा. ठिगळे यांचे ‘चला खेडी घडवू या’ या विषयावर व्याख्यान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वेळी बोलताना प्रा. ठिगळे म्हणाले, ग्रामीण भागात शाश्वत विकास होण्यासाठी वाचन संस्कृती रुजण्याची गरज आहे. वाढता चंगळवाद माणसाला विनाशाकडे नेणारा आहे. चंगळवादाचे वेड लागण्यापेक्षा वाचनाचे वेड लागले पाहिजे. सण समारंभावर उधळपट्टी करण्यापेक्षा लोकांना पुस्तके भेट दिली पाहिजेत. एवढेच नव्हे तर पुस्तके भेट देणे हे प्रत्येकाला आपले सामाजिक व नैतिक कर्तव्य वाटले पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने खेडी सुधारणार नाहीत.

अलिकडच्या काळात भ्रमणध्वनी व चित्रवाणी यांच्या अतिवापरामुळे करमणूक प्रधान पिढी निर्माण होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर वाचनालये अधिक समृद्ध करण्याची आणि लोकांत वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. वाचन संस्कार आणि संस्कृती विकसित झाल्याशिवाय ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण होणार नाही असेही ते म्हणाले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रशिक्षण समन्वयक प्रा. महादेव माळी यांनी केले. उपस्थितांचे आभार सुभाषचंद्र राजमाने यांनी मानले. सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Create love reading villagers ysh
First published on: 15-01-2022 at 01:51 IST