नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या केतकी चितळेविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कळवा (ठाणे) येथील गुन्ह्यात जामीन मिळण्यापूर्वी केतकीला अटक करावी, अशी मागणी तक्रारदाराने पारनेर पोलिसांकडे केली आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे, की ज्येष्ठ नेते पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण करून केतकी चितळे हिच्यासह वकील नितीन भावे व इतरांनी विविध समाजात तेढ निर्माण केली आहे. सदर कवितारूपी लिखाण हे संत तुकारामांचे असल्याचे भासवून संत तुकारामांचा अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायासह संत तुकारामांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत.

केतकी चितळे हिने यापूर्वीही हेतूपुरस्सर आक्षेपार्ह विधाने करून विविध समाजांमध्ये तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ११ जुलै २०२० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान केला आहे. बौद्ध धर्मीय व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या भावना दुखावणारे प्रक्षोभक लिखाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी केतकी चितळे विरोधात दंगल घडवण्यासाठी विविध समाजामध्ये तेढ निर्माण करणे, आक्षेपार्ह, प्रक्षोभक लिखाण करणे, बदनामी करणे आदी आरोपांवरून गुन्हा दाखल केला आहे. 

वरिष्ठांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

काल, रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास संजीव भोर पारनेर पोलिसांकडे फिर्याद देण्यास गेले. सुरुवातीला पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. तीन तास हुज्जत घालूनही पोलीस फिर्याद दाखल करण्यास तयार नसल्याने त्यांनी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल झाला.

केतकी चितळेविरुद्ध कर्जत येथेही तक्रार

कर्जत : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या केतकी चितळेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे करण्यात आली. तसे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा सोनमाळी, सभापती छाया शेलार, कार्याध्यक्ष प्रीती जेवरे व स्वाती पाटील, युवती अध्यक्षा राजश्री तनपुरे, हर्षदा काळदाते, लंकाबाई खरात, पूजा मेहेत्रे , सुवर्णा राऊत, संगीता सोनमाळी, चैत्राली  भैलुमे, अश्विनी नेवसे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. या निवेदनात म्हटले आहे, की आमचे श्रद्धास्थान शरद पवार त्यांच्याबाबत केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीने आक्षेपार्ह लेखन केले. ही महाराष्ट्राची संस्कृती नसून, हे कृत्य अगदी खालच्या पातळीवरील आहे. केतकी चितळेवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.