|| प्रदीप नणंदकर

तीन हजार कोटींच्या ‘लातूर पॅटर्न बाजारा’ने भयपर्वाची सुरुवात

ज्या ‘लातूर पॅटर्न’ने शैक्षणिक गुणवत्तेत ग्रामीण भागाची भरारी जोखली जात होती, त्याच ‘लातूर पॅटर्न’च्या योगाने शिक्षण क्षेत्राचे प्रथम बाजारीकरण आणि त्यापाठोपाठ गुन्हेगारीकरण सुरू झाले आहे. तब्बल तीन हजार कोटींची उलाढाल असलेल्या या ‘उद्योगा’ने खंडणी, खून आणि दहशतीचे प्रकारही फोफावत असून संस्थाचालकांना सुरक्षा कवचात वावरावे लागत आहे.

गेल्या रविवारी लातुरात अविनाश चव्हाण या शिकवणीवर्ग चालकाचा गोळय़ा घालून खून करण्यात आला. त्यामुळे विद्येच्या प्रांगणात शिरलेल्या या प्राणघातक अविद्येचा मुद्दा मोठय़ा प्रमाणात चर्चेत आला असून या अविद्येवर मात कशी करायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘लातूर पॅटर्न’च्या नावावर खासगी शिकवणी चालकांनी अक्षरश: शुल्क आकारणीचा उच्छाद मांडला आहे. विज्ञान शाखेत प्रवेशासाठी ९८ टक्क्य़ांपेक्षा कमी गुण घेणारे विद्यार्थी तर शहरात अनुदानित तुकडय़ांमध्ये शिकूच शकत नाहीत, अशी स्थिती आहे. तरीही शहरातील महाविद्यालयांमध्ये आणि खासगी शिकवणी वर्गात शिकणाऱ्या ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येकी १० हजार. कागदोपत्री प्रवेश अन्य जिल्ह्य़ात आणि शिकवणी वर्ग लातुरात, अशी संख्या ३० हजार. एका विद्यार्थ्यांला शिकवणी वर्गासाठी लागणारे वार्षिक शुल्क एक लाख रुपये. पुस्तके, निवास, भोजन खर्च असा दोन लाख रुपये खर्च वेगळा. परिणामी अर्थकारणाला मिळालेल्या कलाटणीमुळे बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक प्रांतातून शिक्षकांना शिकवणी वर्गाच्या संचालकांनी लातूरमध्ये आणले. त्यांना वर्षांला मिळणारे वेतन १२ लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत आहे. अशा शिक्षकांची संख्या २५०च्या घरात आहे. अर्थकारणाची ही व्याप्ती आणि त्यातील गुंते एवढे आहेत, की अनेक संस्थाचालक आता स्वसंरक्षणासाठी अंगरक्षक वापरतात. बहुतेकांनी रिव्हॉल्व्हरचे परवानेही घेतले आहेत. शिक्षणाच्या बाजारातून वाढलेले भय हे या स्तरावर पोहोचले आहे.

वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील हमखास यशासाठी ‘लातूर पॅटर्न’ हा रामबाण उपाय मानला गेला. वैद्यकीय प्रवेशासाठी प्रारंभी सीईटी व आता नीट, अभियांत्रिकी प्रवेशासाठीही सीईटी, जेईई, आयईईई, आयआयटी अशा परीक्षेसाठीची तयारीही लातुरात चांगल्या प्रकारे करून घेतली जात असल्यामुळे राज्यभरातून विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. परिणामी लातूरच्या शैक्षणिक बाजारपेठेची भरभराट झाली. ३० वर्षांपूर्वी साध्या इमारतीत महाविद्यालयात शिक्षण दिले जात होते. विनाअनुदानित तुकडय़ांच्या जोरावर त्या महाविद्यालयाचा परिसर ओळखता येणार नाही इतक्या टोलेजंग इमारती उभारल्या गेल्या. शिक्षणाचा बाजार प्रारंभी याच नामवंत संस्थांनी मांडला. विद्यार्थी संख्या मोठय़ा प्रमाणावर लातूरला येऊ लागल्यामुळे शिकवणीवर्गाची संख्याही दरवर्षी वाढू लागली. मग बाजारपेठेच्या प्रभावावर प्रत्येक क्षेत्रात जशा अपप्रवृत्ती घुसतात तशा याही क्षेत्रात घुसल्या. कमी जागेत अधिक विद्यार्थी, विद्यार्थी आकृष्ट व्हावेत यासाठी फसव्या जाहिराती, एकच विद्यार्थी चार ते पाच शिकवणीवर्गात असल्याचा आभास निर्माण केला जातो. त्यातून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होते. विद्यार्थ्यांसाठी शहरात अभ्यासिकाही सुरू आहेत. तीही बाजारपेठ मोठी असून गेल्या काही वर्षांत वातानुकूलित अभ्यासिकांचे पेव फुटले आहे.

सर्व सोयींनी युक्त अशी अद्ययावत वसतिगृहे, सकाळच्या नाश्त्यापासून ते जेवण, फळे, दूध, चहा अशी व्यवस्था उपलब्ध होऊ लागली. यातून शहराची आíथक उलाढाल वाढली. एका विद्यार्थ्यांला वर्षभरात किमान शैक्षणिक शुल्कासाठी एक लाख रुपये खर्च येतो. निवास, भोजन यासाठी वार्षकि ६० हजार रुपये वहय़ा, पुस्तकांवरील २० हजार रुपये व अन्य २० हजार रुपये असा एकूण खर्च दोन लाख रुपये येतो. हीच उलाढाल एक हजार कोटींच्या घरात आहे. शिकवणीवर्ग व महाविद्यालयातील रोजगाराचा विचार केला असता थेट रोजगार किमान दोन हजार लोकांना आहे.

शिकायला येणारे विद्यार्थी ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण घेणारे आणि महाविद्यालयात त्यांना शिकविणारे प्राध्यापक ६० टक्के गुण घेणारे! ही विसंगती दूर करण्यासाठी शिकवणीवर्गात उच्चविद्याविभूषित व शिकवण्याचे कौशल्य असणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य मिळू लागले आणि मग महाविद्यालयांतील शिक्षकांना कामच उरले नाही.

सरकारचा अंकुश हवा

लातूर शहरातील शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी अतिशय तपश्चय्रेने चांगले नाव कमावले आहे. या नावाला काळिमा फासण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढत आहेत. शिकवणीवर्ग चालकांमध्ये बेदिली वाढते आहे. शासनाने कडक बंधने आणली आणि जागरूकता दाखवली तर या प्रकारांना आळा बसेल आणि लातूरचे शैक्षणिक वातावरण अबाधित राहील, अशी अपेक्षा प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी व्यक्त केली.

दहशतीचा शिरकाव

  • शिकवणीवर्गातील उलाढाल लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांत ज्यांचा शिक्षणाशी संबंध नाही अशी पसेवाले मंडळी उतरू लागली.
  • धंदा चालवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर सुरू झाला.
  • परिणामी शिकवणी वर्गचालकांकडून खंडणी उकळणाऱ्यांची संख्या वाढली. त्यांना संरक्षणाची हमी देणारे दादाही आत घुसले. त्यांचा हप्ता वेगळा सुरू झाला.
  • शिकवणीचालकांना सुरक्षारक्षक नेमून काम करावे लागते आहे, तर काही शिकवणीचालकांनी थेट शस्त्राचे परवानेच घेतले आहेत.
  • हाणामाऱ्यांचे प्रकारही अधूनमधून घडतात, मात्र त्याची फारशी दखल घेतली जात नाही.

शिकवणी वर्गचालकांची स्पर्धा भयंकर वाढत असून द्वेष, मत्सर यातून वैरभाव वाढतो आहे. प्रशासनाने याला वेळीच प्रतिबंध घातला नाही तर खुनाचे प्रकार भविष्यात आणखीन वाढू शकतात.    – प्रा. उमाकांत होनवार, रिलायन्स पॅटर्नचे प्रमुख