Crime News in Marathi :अनेकदा हत्येचा छडा लावणं पोलिसांसाठी जिकरीचं काम असतं. आरोपीने कोणतेच पुरावे मागे सोडलेले नसतात. सराईत गुन्हेगाराप्रमाणे हत्या झालेली असते. पण हत्येचा तपास करणं गरजेचं असतं. त्यामुळे पोलीस यंत्रणांकडून शक्य तितक्या सर्व शक्यता तपासून पाहिल्या जातात. सर्वबाजूने चौकशी करून झालेली असते. परंतु, तरीही उलगडा होत नाही. पण आरोपी काहीतरी पुरावा मागे ठेवून जातोच, त्यामुळे तो पकडला जातो अन् हत्येचा तपास लागतो. असाच प्रकार नालासोपारा येथे घडलेल्या एका हत्या प्रकरणात झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. १० मे रोजी नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एक नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह सापडला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन अपघाती मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. परंतु, मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता. त्याच्या शरीरावर कोणत्याच ओळख खुना नव्हत्या. त्याच्या आजूबाजूला कोणतं सामानही नव्हतं. मोबाइलही गायब होता. अशा परिस्थितीत या हत्येचा छडा कसा लावायचा हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला. पोलिसांनी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्यांना त्याच्या खिशात सापडलेल्या त्या चार अक्षरांनी मदत केली. या चार अक्षरांच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि हत्येचा उलगडा झाला. हेही वाचा >> Dadar Suitcase Murder : दादर सूटकेस हत्या प्रकरणाला नवं वळण, अर्शदच्या पत्नीचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप हत्येचा तपास करत असताना पोलिसांना मृतदेहाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत ESEL अशी चार अक्षरं लिहिली होती. लागलीच पोलिसांनी ही चार अक्षरे इंटरनेटवर शोधली. त्यांना ESEL सारख्या आस्थापनांचे १५० हून अधिक संपर्क क्रमांक सापडले. पोलिसांनी या सर्व क्रमाकांवर संपर्क साधला. अखेर त्यांना मुंबईच्या मानखुर्द येथील एसेल स्टुडिओशी या मृतदेहाचं असलेलं कनेक्शन सापडलं. त्यामुळे पोलिसांनी लागलीच या स्टुडिओला भेट दिली. तेव्हा कळंल की आऊटडोअर चित्रपटांच्या शुटींगसाठी ज्युनिअर कलाकार पुरवणारा संतोष कुमार यादव (२७) ७ मेपासून बेपत्ता आहे. एक क्लू आणि पोलीस पोहोचले आरोपीपर्यंत या एका क्लुमुळे पोलिसांना या प्रकरणाची लिंक लागत गेली. पोलिसांनी तपास पुढे सुरूच ठेवला. पुढच्या तपासात असं आढळलं की या यादवचा शेवटचा फोन कॉल एका ज्युनिअर आर्टिस्ट असलेल्या एका महिलेशी झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी केली. तिच्या चौकशीतून आढळलं की सुनिल सिंग आणि राहुल सोहन पाल यांच्याबरोबर यादव होता. हे सर्व सिनेसृष्टीत एजंट म्हणून काम करत होते. व्यावसायिक मत्सरातून झाली हत्या तीन दिवसांनंतर, पोलिसांनी सुनील सिंहला ठाण्यातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानेच राहुल पालच्या मदतीने संतोष कुमार यादवची हत्या केल्याचं कबुल केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादवने एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ज्युनियर कलाकारांसाठी देण्याचे मोठे कंत्राट मिळवले होते. त्यामुळे सुनिल सिंह याला राग आला होता. संतापाच्या आणि मत्सराच्या भराने त्याने संतोष कुमार यादवची हत्या केली. अशी केली हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह आणि पाल यांनी ७ मे रोजी यादवला कराराची ट्रीट म्हणून मद्यपानासाठी बोलावले होते. त्याला नालासोपारा येथील एका पुलाजवळ एका निर्जन स्थळी नेले आणि कथितरित्या त्याचा दगडाने वार करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या नाल्यात टाकण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. सिंगला १४ मे रोजी भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (गुन्ह्याशी संबंधित पुरावे गायब करणे) अंतर्गत अटक करण्यात आली होती. महिनाभर राहुल पालचा शोध घेतल्यानंतर तो हरियाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने हरियाणात जाऊन त्याला फरीदाबाद जिल्ह्यातील जाजरू गावातून पकडले.