महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी फसवणूक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तक्रार केल्यानंतर बँकेचे तत्कालीन अध्यक्ष रामकृष्ण बांगर, तसेच व्यवस्थापक बी. बी. सानप व इतरांविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला पोलिसांनी याबाबत दुर्लक्ष केले होते, मात्र केशवराव नागरगोजे व इतर ठेवीदारांनी खंडपीठात धाव घेतली होती.
बांगर अध्यक्ष असलेल्या महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत मागील काही वर्षांपूर्वी अनेक ठेवीदारांनी मुदत ठेवी जमा केल्या होत्या. हे पसे मुदतीनंतर मिळतील, असा विश्वास ठेवीदारांना होता, मात्र लाखो रुपयांच्या ठेवींच्या रकमेची मुदत संपून गेल्यानंतरही फुले बँकेच्या अधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या रकमा परत केल्या नाहीत. या प्रकरणात बँकेचे माजी अध्यक्ष बांगर, व्यवस्थापक बी. बी. सानप व संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठेवीदार केशवराज नागरगोजे, भुजंगराव बडे, पांडुरंग भोसले, कैलास जायभाये व निवृत्ती मुंडे यांनी २३ एप्रिलला तत्कालीन पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली होती. मात्र, या तक्रारीवर निरीक्षकांनी कुठलीही कारवाई केली नाही. पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ झाल्यामुळे या पाच ठेवीदारांनी नागरगोजे यांच्या वतीने २९ मे रोजी पोलीस अधीक्षकांना टपालाद्वारे तक्रार पाठवून या प्रकरणात दखलपात्र गुन्हा नोंदवून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, अधीक्षकांकडे तक्रार दिल्यानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
अखेर नागरगोजे व इतर ठेवीदारांनी अॅड. नरसिंग जाधव यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. या याचिकेची २२ जुलैस प्राथमिक सुनावणी झाली. त्यात खंडपीठाने सहायक सरकारी वकिलांना बीडच्या पोलीस अधीक्षकांनी या तक्रारीच्या अनुषंगाने कोणती कारवाई केली, याबाबत माहिती घेण्याचे आदेश दिले होते. तसेच याचिकेची पुढील सुनावणी ५ ऑगस्टला ठेवण्यात आली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर २६ जुलैस याचिकाकत्रे नागरगोजे यांचा पाटोदा पोलिसांनी जबाब नोंदविला.