सांगली : म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्याकांडातील प्रमुख संशयित मांत्रिक अब्बास महंमदअली बागवान याला न्यायालयाने आठ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले. दोन दिवसापूर्वी अटकपूर्व वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले असता त्यांने छातीत दुखत असल्याची तक्रार केली  होती. प्रकृती ठीक असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी त्याला अटक केली.

गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबाची त्याने आर्थिक पिळवणूक केली होती. प्रारंभी सावकारी कर्जाच्या प्रकरणातून सामूहिक आत्महत्या झाल्याचे मिळालेल्या चिठ्ठीवरून निदर्शनास आले होते. मृताजवळ सापडलेल्या चिठ्ठीवरून २५ सावकारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी १९ सावकारांना अटकही करण्यात आली.

म्हैसाळमधील अंबिकानगर आणि सुतारकी येथील दोन घरामध्ये एकाच वेळी एकाच कुटुंबातील ९ जणांचे मृतदेह आढळल्याने पोलिसांनी सखोल तपास केला असता सोलापूरचा मांत्रिक बागवान यांने मदतनीस धीरज सुरवसे याच्या मदतीने चहातून विषारी पदार्थ देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोघांनाही २७ जून रोजी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्यानंतर मुख्य सूत्रधार तथा मांत्रिक बागवान यांने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी त्याची प्रकृती उत्तम असल्याचा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांकडून प्राप्त होताच त्याला अटक करण्यात आली. आज त्याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.