मुंबई : पुण्याच्या नसरापूर येथील घटनेनंतर लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अभिवचनावरील रजेवर (पॅरोलवर) सोडू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. याविषयी कायद्यात सुधारणाही होईल, मात्र मागील तीन वर्षांत सहा हजार १५२ कैद्यांना पॅरोल आणि संचित (फर्लो) रजेवर सोडण्यात आले आहे. मात्र यातील ४० कैदी फरार असून ते अद्याप सापडलेले नाहीत, हे गृहविभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

नसरापूर येथील घटनेनंतर गुन्हेगारांची मानसिकता बदलत नसल्याची बाब स्पष्ट झाले. रजेवर किंवा सुटकेनंतरही लैंगिक अत्याचारातील गुन्हेगार पुन्हा तेच गुन्हे करीत असल्याची बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याविषयीचे निर्देश दिले. पण अशा गुन्हेगारांची रजा नाकारण्याचे अधिकार कायद्यानुसार गृहविभागाकडे नाहीत. याआधी सरकारने याविषयी केलेला कायदा न्यायालयाने रद्दबातल ठरवला. त्यामुळे अभिवचन किंवा संचित रजेवर पाठविल्यानंतर गुन्हेगार पुन्हा गुन्हा करणार नाहीत किंवा ते पुन्हा तुरुंगात परततील की नाही याची शाश्वती नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कोरोना काळात जेलमधील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी सुमारे चाळीस हजरांहून अधिक कैद्यांना सोडण्यात आल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. त्यातील ८०० कैदी परत आले नव्हते असे सरकारी आकडेवारी सांगते. फरार झालेल्या कैद्याच्या विरोधात स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येतो. पुढे फरार कैद्यांना पकडण्यासाठी पोलिसांची खास पथके स्थापन केली जातात.

गृह विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३ ते २०२५ सालात ६१५२ कैद्यांना पॅरोल तसेच फर्लोच्या रजेवर सोडण्यात आले. मात्र त्यातील ८० कैदी फरार झाले. या कैद्यांचा मागोवा पाेलिसांकडून घेण्यात आल्यानंतर त्यातील ४० कैद्यांनाच परत तुरुंगात डांबण्यात पोलिसांना यश आले, मात्र ४० कैदी अद्यापही फरार आहेत.

का द्यावी लागते पॅरोलची रजा

कैद्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू, वैद्यकीय उपचार, आजारपण अशा विविध कारणांसाठी पॅरोल दिला जातो. पॅरोलचा गैरवापर करून पळून गेल्यास कैद्याला दोन वर्षांची अतिरिक्त शिक्षा ठोठावण्याची नियमात तरतूद आहे. जेलमध्ये शिक्षा भोगणारे कैदी अनेकादा फर्लो किंवा पॅरोलवर असताना फरार होतात.त्याला पायबंध घालण्यावरील उपाय सुचवण्यासाठी गृह विभागाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या समितीचे अद्याप काही झालेले नाही.

फर्लो आणि पॅरोल मिळालेल्या कैद्यांची आकडेवारी

वर्ष २०२३

  • रजेवरील कैदी – २७३९
  • फरार कैदी – २५
  • पुन्हा आणलेले कैदी – १७

वर्ष २०२४

  • रजेवरील कैदी – २८०१
  • फरार कैदी – ३०
  • पुन्हा पकडलेले कैदी – १८

वर्ष २०२५

  • रजेवरील कैदी – ३०४५
  • फरार कैदी – २५
  • पुन्हा पकडलेले कैदी – १६