सोलापूर : पोलीस कोठडीत आरोपीला झालेल्या मारहाणीतील मृत्यू प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व तपास अधिकारी शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह सात पोलिसांविरुद्ध गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पाटील हे सध्या सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते यापूर्वी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेपर्यंत अवैध डान्सबार व आ?ॅर्केस्ट्रा बार सुरू राहिल्याप्रकरणी त्यांना निलंबितही करण्यात आले होते. गुन्हे अन्वेषण विभागाच्या सोलापूर पथकाचे पोलीस उपअधीक्षक श्रीशैल गजा यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह हवालदार श्रीरंग खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, पोलीस शिपाई अतिश पाटील व लक्ष्मण पोमू राठोड यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी,की विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या एका गुन्ह्यात आरोपी भीमा रज्जा काळे (वय ४२, रा. भांबुरे वस्ती, कुर्डूवाडी, जि. सोलापूर) यास सोलापूरच्या जिल्हा कारागृहातून पोलीस तपास अधिकारी शीतलकुमार कोल्हाळ यांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी वर्ग करून ताब्यात घेतले होते. नंतर न्यायदंडाधिकाऱ्यांकडून त्यास २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करून घेतली होती. पोलीस कोठडीत असताना आरोपी भीमा काळे यास सर्दी, खोकला, ताप आणि उलटय़ा होत असल्यामुळे आणि त्याचे दोन्ही पायांना कशाचा तरी संसर्ग होऊन दोन्ही पाय सुजले होते. त्यास २४ सप्टेंबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात सहायक पोलीस निरीक्षक कोल्हाळ यांनी दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना ३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे फौजदारी दंड संहिता कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाल्यानंतर पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता.
याबाबत झालेल्या तपासावरून धक्कादायक बाबी समोर आल्या. गुन्ह्यात अटक आरोपी भीमा काळे याने गुन्हा कबूल करावा आणि चोरीला गेलेला माल काढून द्यावा म्हणून त्यास तपास अधिकारी कोल्हाळ व इतर पोलिसांनी मारहाण केली होती. त्या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी आरोपी काळेविरुद्ध दाखल गुन्ह्यात तपास अधिकारी कोल्हाळ यांना तपासामध्ये मार्गदर्शक सूचना दिल्याचे दिसून आले नाही. तसेच २२ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री अटक आरोपी काळे यास पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासमोर हजर केले असता आरोपी काळे हा लंगडत असल्याचे आणि त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे निदर्शनास येऊनसुध्दा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यास वैद्यकीय उपचाराची गरज असताना त्यास वेळेवर वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले नाहीत.
याशिवाय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस ठाण्यात व आवारात आणि प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही कॅमेराअसणे आवश्यक असताना त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध केला नाही. आरोपीला केलेल्या मारहाणीमुळे झालेल्या जखमांकडे तसेच मृत आरोपी मानसिकदृष्टय़ा सक्षम नसल्याचे माहीत असतानाही त्याचे आजारपण आणि मारहाणीमुळे झालेल्या जखमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून तत्काळ वैद्यकीय मदत न पुरविता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील भरारी पथकाचे पोलीस उपअधीक्षक जी. व्ही. दिघावकर हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश