देशात गुन्हेगार महत्वाचे आहेत काय, पोलीस नाही काय?; पोलीस अधीक्षकांवर आरोप करीत जमादारची आत्महत्या

देशात गुन्हेगार महत्वाचे आहेत काय, पोलीस नाही काय?, असा प्रश्न विचारत बिटरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत जमादाराने आत्महत्या केली.

देशात गुन्हेगार महत्वाचे आहेत काय, पोलीस नाही काय?; पोलीस अधीक्षकांवर आरोप करीत जमादारची आत्महत्या
( प्रतिनिधिक छायाचित्र )

यवतमाळ : देशात गुन्हेगार महत्वाचे आहेत काय, पोलीस नाही काय?, असा प्रश्न विचारत बिटरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत जमादाराने आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. विष्णू सखाराम कोरडे (५४) असे मृत पोलीस जमादाराचे नाव आहे. कोरडे यांनी आपल्या आत्महत्येस जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप मृत्यूपूर्व चिठ्ठीत केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पुसद येथील रहिवासी असलेले विष्णू कोरडे हे यवतमाळ पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. ते महागाव येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रकरणात निलंबित झाल्याने त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान त्यांची बदली यवतमाळ पोलीस मुख्यालयात करण्यात आली. चौकशीनंतर बिटरगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. दरम्यान, कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात होऊन, मणक्यास जबर मार लागला. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्याने त्यांनी पुसद येथे बदली करण्याची तसेच वैद्यकीय देयके मंजूर करण्याची विनंती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे केली होती. मात्र अधीक्षकांनी बदलीही केली नाही आणि वैद्यकीय देयकांवर स्वाक्षरीही केली नाही, असा आरोप कोरडे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत केला आहे.

शिवाय जिल्हा पोलीस अधीक्षकांना सपत्नीक भेटण्यास गेलो असता त्यांनी पत्नीसमोरच अपमान केल्याचेही चिठ्ठीत नमूद आहे. एखाद्या गुन्हेगाराचा कोठडीत मृत्यू झाला तर त्याच्यावरील गुन्ह्यांची चौकशी बाजूला सारून संबंधित ठाण्यातील पोलिसांची थेट सीबीआय चौकशी केली जाते. मात्र लाचलुचपत प्रकरणात खोटी तक्रार दाखल असताना एका अपघातग्रस्त पोलिसाला प्रचंड मनस्ताप दिला जातो. यावरून देशात गुन्हेगार महत्वाचे आहेत, पोलीस नाहीत काय, असा प्रश्न पडतो, असेही कोरडे यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.आपल्या मृत्यूस पोलीस अधीक्षक भूजबळ पाटील जबाबदार असल्याचा आरोप करीत विष्णू कोरडे यांनी आज शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेतला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली तरच आपल्याला न्याय मिळेल, असेही त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

चौकशीअंती सत्यता बाहेर येईल – भुजबळ

विष्णू कोरडे यांनी आत्महत्या केल्याची घटना पोलीस दलासाठी दुर्दैवी आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. अपघातानंतर गेल्या दोन वर्षांपासून ते रजेवर होते. या काळात मानवीय दृष्टिकोनातून त्यांचे वेतन नियमित सुरू ठेवले होते. त्यांच्यावरील कारवाई, चौकशी, बदली हे सर्व तत्कालीन अधीक्षकांच्या कार्यकाळातील आहे. त्यांनी लिहलेली मृत्यूपूर्व चिठ्ठीतील हस्ताक्षरांची तपासणी व या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर सत्यता बाहेर येईल. -डॉ. दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधीक्षक, यवतमाळ.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Criminals important country police jamadar commits suicide accusing superintendent police amy

Next Story
“राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका, विशेषतः पवार कुटुंबाकडून…”; सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी