करोनाने कर्ता पुरूष गेल्याने अनेक कुटुंबांवर संकट

अकोले तालुक्यात करोनाने ५० वर्षांच्या आतील कर्ता पुरुष मृत्यू झालेली व  बिकट आर्थिक स्थिती असलेली शंभर पेक्षा जास्त कुटुंबे असावीत असा अंदाज आहे.

corona
करोना

पाहणीतील निष्कर्ष

प्रकाश टाकळकर
अकोले:  करोनाच्या उपचारासाठी झालेला मोठा  खर्च, त्यामुळे आलेले कर्जबाजारीपण,जेमतेम शिक्षण त्या मुळे रोजगाराचा आ वासून उभा राहिलेला प्रश्न, मुलांच्या शिक्षणाची काळजी आणि जोडीदार अकाली सोडून गेल्यामुळे आलेले एकाकीपण,भविष्याची भेडसावणारी चिंता. तालुक्यातील करोनात घरातील कर्ता पुरुष मृत्यू पावलेल्यां कुटुंबीयांची विदारक स्थिती एका सर्वेक्षणात दिसून आली.

अकोले तालुक्यात करोनाने ५० वर्षांच्या आतील कर्ता पुरुष मृत्यू झालेली व  बिकट आर्थिक स्थिती असलेली शंभर पेक्षा जास्त कुटुंबे असावीत असा अंदाज आहे.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने अशा विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी  करोना एकल पुनर्वसन समितीच्या माध्यमातून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या समितीच्या वतीने अशा ६५ कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली. त्यातून या कुटुंबाची विदारक स्थिती लक्षात येते आहे.

करोनामुळे मृत्यू झालेले लोक तालुक्याच्या अगदी दुर्गम गावांपर्यंतच्या कुटुंबातील आहेत. मृत्यू झालेल्यात २१  ते ३० वयोगटातील  ५, ३१  ते ४० वयोगटातील ३२  तर उर्वरित ४० ते ५२ वयापर्यंतचे आहेत. यातील मजुरी करणारे १४, दुकान, हॉटेल चालवणारे ५,   चालक , सुरक्षारक्षक अशी फुटकळ उत्पन्नाची नोकरी केलेले १० तर उर्वरित जण शेती करत होते.  ज्यांना शेती होती तीही अल्प आहे. १३ जणांना तर अवघी काही गुंठे जमीन आहे तर काहींना २ ते ४ एकर जमीन आहे.

या  कुटुंबाची अवस्था अधिकच विदारक होण्याचे कारण करोनाच्या काळात दवाखान्याच्या बिलाने यांचे कंबरडे मोडले आहे. प्रचंड बिलाच्या रकमेने गरीब असलेली ही कुटुंबे पुन्हा गरिबीत ढकलली व  कर्जबाजारी झाली असेही दिसून येते आहे. ज्यांनी बिलाची व कर्जाची माहिती दिली त्यात दहा लाखापेक्षा जास्त बिल झालेली २ कुटुंब असून ५ ते १० लाख बिल झालेली ३ कुटुंबे, २ ते ५ लाख खर्च झालेले  १९ कुटुंबे आहेत तर २ लाखांपर्यंत  खर्च झालेली ३१ कुटुंबे आहेत. शेती आणि मजुरी करणारी ही कुटुंबे दवाखान्याच्या या खर्चाने  कोलमडली. नातेवाइकांकडून अनेकांनी उसनवारी केली आहे. यातील अनेक कुटुंबे कर्जबाजारीही आहेत. त्यात ४ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारी ७ कुटुंबे आहेत तर २ ते ३ लाख कर्ज असणारी ७ कुटुंबे तर २ लाखांपर्यंत  कर्ज असणारी २० कुटुंब आहेत. यातील २० कुटुंबांना स्वत: चे घर नाही . २४ जणांकडे पिवळे रेशनकार्ड तर उरलेल्यांकडे केशरी कार्ड आहे.

असे आव्हान पेलणाऱ्या या विधवा महिलांची स्थिती कशी आहे? हे बघितले तेव्हा त्यांचे फारसे शिक्षण  झालेले नाही असे दिसून आले. वयानेही त्या खूप कमी वयाच्या आहेत. यातील १४ जणी ३०  वर्षांच्या आतील आहेत. ३१ ते ४० दरम्यान वय असणाऱ्या  ३८ जणी तर ४१ ते ५० वयोगटातील १३ महिला आहेत. यातील उपलब्ध माहितीनुसार एक महिला निरक्षर असून, ७ थी पर्यंत शिकलेल्या ६ जणी,  ८ वी ते १० वी शिकलेल्या २१ महिला, १२ वी शिकलेल्या ७ जणी तर  ७ जणी पदवीधर आहेत.

जवळपास सर्व कुटुंबात शिक्षण घेणारी लहान मुले आहेत. या मुलांचे शिक्षण करणे हेच मोठे आव्हान या महिलांपुढे आहे. या मुलांची वयंही कमी आहे. २ महिने वयाचे, ७ महिन्याचे, दहा महिन्याची २ बाळे आहेत. तर ६ वर्षांच्या आतील ११ मुले आहेत. १ ली ते ४ थीची ११ मुले, ५ वी ते ७ वीचे २० विद्यार्थी, ८ वी ते १० वी चे १५ विद्यार्थी, ११वी १२ वीचे १७ विद्यार्थी असून १२ विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत आहेत.

ही माहिती संकलित करायला रमेश बुडनर, नवनाथ नेहे, ललित छल्लारे संगीता साळवे, नीलेश तळेकर, ज्ञानेश्वर सुर्वे, संतोष मुतडक, श्रीनिवास रेणुकादास, शिवाजी नेहे, बाळासाहेब मालुंजकर, शंकर संगारे, मनोज गायकवाड, दिलीप साळवे, राणी कोळपकर यांनी मदत केली. या माहितीचे संकलन व विश्लेषण हेरंब कुलकर्णी यांनी केले.

व्यवसाय मार्गदर्शनाचे नियोजन

तहसीलदार यांच्या आदेशानुसारही अशा महिलांच्या सर्व आर्थिक समस्या व कौटुंबिक स्थिती याविषयीचे सर्वेक्षण तालुक्यात सुरू आहे. त्यानंतर या कुटुंबांना शासनाच्या विविध विभागांतर्फे मदत केली जाणार आहे.   अकोले तालुका एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने या महिलांना विविध रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी  कार्यकर्त्यांंनी या महिलांच्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यानुसार व्यवसाय मार्गदर्शनाचे नियोजन सध्या सुरू आहे अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Crisis on many families corona virus ssh 93