दोन्ही काँग्रेसला महाराष्ट्र लुटायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्राचे हित एकटी शिवसेनाच पाहू शकते, हे लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठीच जनतेने शिवसेनेला पुर्ण बहुमतात राज्याच्या सत्तास्थानी बसवावे, असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी येथे जाहीर सभेत बोलताना केले.
नगर शहर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. राठोड यांच्यासह शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख सुहास सामंत, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सभेपूर्वी ठाकरे यांची उघडय़ा वाहनातून प्रचार फेरी काढण्यात आली.
भाजपमधील काहींनी त्यांच्या स्वार्थासाठी राज्यातील २५ वर्षांची युती तोडली, असा आरोप ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, गेली पंधरा वर्षे महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकतच आला, आताही तेच सुरू आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राज्यात भाजपचा विस्तार झाला. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना आता जनतेने धडा शिकवला पाहिजे. त्यांची ही कृती शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नगर शहरातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू असे आश्वासनही त्यांनी दिले.
आमदार राठोड यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. शरद पवार यांच्या नगरमधील भाषणाचा संदर्भ देऊन ते म्हणाले, त्यांच्याच पक्षात गुंडांचा मोठा भरणा आहे. किंबहुना राष्ट्रवादी हा गुंडांचाच पक्ष आहे. त्यांच्याच पक्षातील लोकांनी या गोष्टी जनतेसमोर आणल्या आहेत. गेले पंचवीस वर्षे शिवसेनेकडे आमदारकी आहे म्हणूनच शहर टिकून आहे, यांच्या हातात ही सत्ता असती तर त्यांनी केव्हाच शहर विकून टाकले असते, असा आरोप राठोड यांनी केला. शहरात केवळ शिवसेनाच विकास करू शकते, हे दोन्ही महापौरांच्या काळात दाखवून दिले आहे, असा दावाही त्यांनी केला. बांदेकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांची यावेळी भाषणे झाली. संभाजी कदम यांनी प्रास्तविक केले.
‘बाहेरची जनता पार्टी’
ठाकरे यांनी भाजपचा ‘बाहेरची जनता पार्टी’ असा तर, राष्ट्रवादीचा ‘भ्रष्टवादी’ असा उल्लेख केला. भाजपने एकटय़ा नगर जिल्ह्य़ात बाहेरचे सात उमेदवार आयात केल्याचे ते म्हणाले. राठोड यांनी त्यांच्या भाषणात संरक्षणाचा मुद्दा मांडताना शिवसेना-भाजप युतीनेच नागरिकांना संरक्षण दिल्याचे सांगितले, मात्र ही गल्लत लक्षात येताच पुन्हा शिवसेनेचा उल्लेख केला. सभेत सुरूवातीलाच भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा जोरदार जयजयकार करण्यात आला.