“पण ते ठाकरे सरकारला ऐकायलाच गेले नाही..”; विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्काच्या कपातीवरून शेलारांची टीका

पब, पार्टी आणि पेग.. गुड गोईंग! असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे

Criticism of Ashish Shelar over reduction of excise duty on foreign liquor

महाविकास आघाडी सरकारने विदेशी मद्याच्या किमती ५० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे विदेशी मद्याची तस्करी रोखली जाऊन विक्रीत वाढ होईल. राज्याच्या महसुलात वाढ होईल, असा दावा राज्य सरकारने केला आहे. राज्यात नवे मद्यविक्री परवाने धोरण आणण्याचाही राज्य सरकारचा विचार आहे. महाराष्ट्र शासनाने विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केली. आयात केल्या जाणाऱ्या विदेशी दारूवर महाराष्ट्रात ३०० टक्के एक्साइज ड्युटी होती. आता महाराष्ट्रात विदेशी दारूवर १५० टक्के एक्साइज ड्युटी लागू होईल. या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

राज्य सरकारने आयात केल्या जाणाऱ्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर राज्यात विकल्या जाणाऱ्या किमतीतच आता महाराष्ट्रातही विदेशी मद्य मिळणार आहे. विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आली. आयात केल्या जाणाऱ्या ‘विदेशी’ मद्य विक्रीतून राज्य शासनाला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, आता सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने विदेशी मद्याची आयात वाढण्याची अपेक्षा आहे. त्यातून सरकारचा महसूल २५० कोटीपर्यंत जाईल, असा दावा शासनाने केला आहे.

या निर्णयावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, तेव्हा राज्याने आपले कर कमी करावेत, अशी मागणी आम्ही केली. पण ते ठाकरे सरकारला ऐकायलाच गेले नाही. मात्र,आता विदेशी दारुच्या किंमती ५० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. पब, पार्टी आणि पेग.. गुड गोईंग!,” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

तर गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. “महाराष्ट्र सरकारने दारू वरची एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली. हरबल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा, असा महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार सुरु आहे. एक्साइज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम हातात घेतले आहे”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

दरम्यान, उत्पादन शुल्क अधिक असल्याने चोरी-छुप्या मार्गाने राज्यात विदेशी दारूची तस्करी होत होती. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्याने इतर राज्यांतून महाराष्ट्रात होणारी ‘विदेशी’ मद्याची तस्करी, तसेच बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे असा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Criticism of ashish shelar over reduction of excise duty on foreign liquor abn

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या