सरकार स्थापन होऊन ४ महिने लोटले, तरी पालकमंत्र्यांना जिल्ह्य़ाच्या पालकत्वाची अजून जाणीवच झाली नाही की काय, असा प्रश्न उपस्थित करून अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भेटून आधार देण्याचे सोडून मंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सरकारने फळबागांसाठी एकेरी २५ हजार, बागायतीस १५, तर घराच्या पडझडीसाठी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जिल्ह्यात सलग ५ दिवसांपासून झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील पीक, फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी वडवणी, धारूर, माजलगाव या तालुक्यांच्या नुकसानग्रस्त भागात पाहणी केली. वडवणी येथे पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसानीपोटी सरकारने फळबागांसाठी २५ हजार, बागायतीसाठी १५ हजार, तर घराच्या पडझडीसाठी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी. या साठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त दुष्काळग्रस्तांसाठी सरकारकडे २४४ कोटींची मागणी आपण केली होती. आतापर्यंत १२० कोटीच मिळाले. घोषणा करूनही सरकारने प्रत्यक्षात निधी मात्र दिला नसल्याचा आरोप मुंडे यांनी केला. सरकार सत्तेवर येऊन ४ महिने लोटले. जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर आहे. मात्र, पालकमंत्र्यांना पालकत्वाच्या जबाबदारीची जाणीवच झाली नाही की काय, असा प्रश्न पडतो. दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे सर्वसामान्य शेतकरी संकटात सापडला असताना जिल्हा वाऱ्यावर सोडून पालकमंत्री बिनधास्त आहेत. अजून त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केली नाही, अशी टीका मंत्र्यांचा नामोल्लेख टाळून केली.
हिवरगव्हाण येथे झाड पडून मंदिराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी स्थानिक विकासनिधीतून सभागृह देण्याची घोषणा, तसेच चिंचोटी येथील मयत शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने तात्काळ मदत न केल्यास संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला.