शेतकऱ्यांना मदत करणे हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. अडचणीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात पुढे करणे हे खरे महाराष्ट्राचे मॉडेल (प्रारूप) आहे अशा शब्दात केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयांचा लेखाजोखा मांडतानाच तुम्ही काय विखे पिता-पुत्रांना ठेचता. या निवडणुकीत तुमच्या उमेदवारालाच मतदार ठेचतील अशी टीका कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर केली.शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी अस्तगाव आणि एकरुखे येथील जाहीर सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष भागवतराव गोर्डे होते. राष्ट्रवादीचे नेते व गणेशचे अध्यक्ष अॅड. नारायण कार्ले,बाळासाहेब गायकवाड, विनायकराव निकाळे, सभापती निवास त्रिभूवन, उपसभापती सुभाष विखे,बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कडू, सरपंच केशवराव चोळके आदी उपस्थित होते.विखे म्हणाले, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना उपाशी ठेवले असे राज ठाकरे म्हणतात. त्यांच्या मालमत्तेवरुन घरात भांडणे सुरु आहेत. ते आमच्यावर टीका करतात, ठेचण्याची भाषा करतात. मात्र शिवसेनेला अनेकांनी रामराम ठोकला. सेनेला आता घरघर लागली आहे. बाबर, नार्वेकर असे अनेक नेते पक्षाला सोडून गेले. त्यावर पक्षाची स्थित काय होती ते पहा. चार वेळा निवडून आलेल्या खासदारांकडून पैसे मागणे योग्य आहे का असा खोचक सवालही त्यांनी केला.विरोधी उमेदवार या मतदारसंघातील नाही. त्याची आपल्याशी बांधिलकी नाही त्यांना मतदान करणार की काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे यांना असा सवाल विखे यांनी केला. ते म्हणाले, वाकचौरे यांनी या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेत मांडले. त्यांची या मतदारसंघाशी बांधिलकी आहे. त्यांनाच विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.