सांगली : महागाईमुळे असलेला जनतेचा रोष टाळण्यासाठी बुजगावण्यांच्याकडून धर्माची अफूची गोळी भाजपकडून दिली जात असल्याची टीका जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत विचारले असता, मनसेची ताकद कमी आहे, मात्र, त्यांना इतर कोणी मदत केली तर निश्चितच त्याचा विचार गृहविभागाला करावा लागेल. सध्या देशात महागाईने कहर केला असून सामान्य माणसाला उद्याचा दिवस कसा काढायचा याची चिंता झोपताना रोज सतावत आहे. अशावेळी मायर्सने म्हटल्याप्रमाणे धर्माची गोळी देण्याचा प्रकार बुजगावण्याच्या माध्यमातून केला जात आहे.
बाबरी पतनावेळी आपण उपस्थित होतो हे मला मित्र असताना का सांगितले नाही याची विचारणा आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असून त्यावेळी कोणत्या बाजूने बाबरीवर चढाई केली, पोलिसांच्या लाठीमारावेळी पलायन केले का, गुन्हे दाखल झाले का, या प्रश्नांची उत्तरे आपण फडणवीस यांच्याकडून निश्चित घेऊ, मात्र, ज्यावेळी बाबरीपतन झाले, त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उघडपणे जबाबदारी घेतली तशी भाजप नेत्यांनी का घेतली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यात सत्तांतराच्या वेगवेगळय़ा तारखा आतापर्यंत देण्यात आल्या. तरीही सत्ता बदल झालेला नाही, यामुळे तारखा देणाऱ्या ज्योतिषाचीच चौकशी करावी लागेल असे चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याबाबत त्यांनी म्हटले. भाजपसोबत आघाडी करण्याचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीपुढे नव्हता, तशी चर्चाही झालेली नव्हती, मात्र आशिष शेलार यांनी तसा दावा केला असला तरी त्यावेळी शिवसेनेशी युती होती. आणि सरकारलाही धोका नव्हता, मग असा दावा कसा शक्य आहे असेही मंत्री पाटील म्हणाले.