scorecardresearch

“उद्धव ठाकरेंवर टीका करा वाय दर्जाची सुरक्षा मिळवा अशी योजना केंद्राने सुरु केलीय; कंगना, सोमय्या, नवनीत राणा लाभार्थी”

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देण्यात येणाऱ्या संभाव्य अतिरिक्त सुरक्षेसंदर्भातही व्यक्त केलं मत

Uddhav Thackeray Security
राज ठाकरेंबद्दलही केलं भाष्य (फाइल फोटो)

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महाविकास आघाडीवर टीका केल्यास केंद्र सरकारकडून तात्काळ वाय सुरक्षा मिळते हे अनेक उदाहरणावरून दिसते. टीका करणे हा सुरक्षा मिळवण्याचा मार्ग बनला आहे. राज ठाकरे यांना पुर्वीपासूनच आवश्यक ती सुरक्षा आहे. त्यामुळे ते केंद्राची सुरक्षा घेतील असे मला वाटत नाही,” असं मत विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. नीलम गोऱ्हे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

“कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. “ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे ते मुख्यमंत्री यावर बोलतात, टीका करा आणि वाय दर्जाची सुरक्षा मिळावा अशी ही योजना आहे,” असंही त्यांनी म्हटलंय. “विकासाच्या प्रश्नापासून लक्ष उडविणे व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशीदिवरील भोंगे व हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला असून हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून नये असा सल्ला राज ठाकरे यांना नीलम गोऱ्हेंनी दिला. इतकच नाही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार असल्याची चर्चा असून याबद्दल प्रश्न विचारला असता, “पक्षाने आदेश दिल्यास अयोध्येला जाईन,” असे त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

धाराशिव व संभाजीनगर नामकरण बाबत केंद्राची दुटप्पी भूमिका असल्याची टीका नीलम गोऱ्हेंनी केली. हेच भाजपचे हिंदुत्व आहे का?, असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी विचारला आहे. उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक ठराव शिवसेनेने मांडले, मात्र केंद्र सरकारच्या दुजाभाव व दुटप्पी भूमिकेमुळे हे नामकरण होत नसल्याची टीका त्यांनी केली. “नामांतरण करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे, नामकरण ही लोकाभवना असून दिल्लीतील रस्त्याची व हैद्राबादचे भाग्यनगर हे नामकरण होते मात्र महाराष्ट्र बाबत दुजाभाव केला जातो, केवळ राजकारणासाठी भाजपाचे हिंदुत्व आहे,” अशी टीका गोऱ्हे यांनी केली.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. त्याच अनुषंगाने आम्ही काम करत असल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Criticize cm uddhav thackeray to get z security is new central government scheme neelam gorhe slams bjp scsg

ताज्या बातम्या