सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे बुधवारी सायंकाळी एका शेतकऱ्याच्या विहिरीत मोठी मगर आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संभाजी जमदाडे यांच्या विहिरीत ही मगर दिसून आली. या घटनेची माहिती वनविभागाला तातडीने देण्यात आली. मात्र, बुधवारी रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी या मगरीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबवले जाणार आहे.

विद्युत पंप बंद करताना झाले दर्शन

कोरवली गावामध्ये तशी कोणतीही नदी नाही, मात्र या परिसरात उजनी डाव्या कालव्याचा मुख्य फाटा आहे. कोरवली-मंद्रूप रस्त्यालगत मोठा कालवा असून त्याजवळच एक तलाव आहे. या तलावाच्या खालील बाजूस संभाजी जमदाडे यांची शेतजमीन आहे. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतातील विद्युत पंप बंद करण्यासाठी जमदाडे विहिरीकडे गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीच्या कड्यावर एक मोठी मगर बसलेली दिसली. त्यांनी या धक्कादायक प्रकाराची माहिती तातडीने डॉ. अमोल पाटील आणि शशिकांत कस्तुरे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत खात्री केली असता विहिरीतील कड्यावर मगर स्पष्टपणे दिसून आली. यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर तसेच उपवनसंरक्षक कार्यालय व मोहोळ वनपरीक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

महापुरात वाहून आल्याची शक्यता

मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोरवलीपासून काही अंतरावर असलेल्या अकोलमंद्रूप आणि तेलगाव येथील सीना नदीला मोठा महापूर आला होता. या महापुराचे पाणी दूरवर पसरले होते आणि काही ठिकाणी हे पाणी मोठ्या कालव्यांमध्ये (कॅनाॅल) शिरले होते. याच पुराच्या पाण्यातून ही मगर कोरवली परिसरात आली असावी, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दोन महिन्यांपूर्वीही कालवा परिसरात शेळ्या राखणाऱ्यांना ही मगर दिसली होती, मात्र ती वेगाने पाण्यात गेल्याने काहींनी ती मोठी घोरपड असावी असा संभ्रम व्यक्त केला होता. जमदाडे यांनीही काही दिवसांपूर्वी विहिरीत मगर पाहिली होती, पण मोबाईलमध्ये फोटो काढण्यापूर्वीच ती पाण्यात गडप झाली होती.

पालखी सोहळ्याच्या गर्दीमुळे पथकाला विलंब

“वनविभागाचे रेस्क्यू पथक एका जखमी वन्यप्राण्याला उपचारासाठी पुण्याला घेऊन गेले होते. पुण्यातून परतत असताना मार्गात पालखी सोहळ्याची मोठी गर्दी असल्याने पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. ग्रामस्थांनी विहिरीमध्ये उतरण्याचे धाडस करू नये. केवळ लांबूनच लक्ष ठेवावे. गुरुवारी सकाळी रेस्क्यू टीम या मगरीला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त करेल.” – अजित शिंदे, सहाय्यक उपवनसंरक्षक, सोलापूर