उमाकांत देशपांडे मुंबई

राज्य सरकारने सुमारे ४३ लाख ६० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊनही चालू खरीप हंगामात केवळ २१ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

गेल्या वर्षी दुष्काळामुळे लाखो शेतकऱ्यांपुढे अडचण असून त्यांनी कर्ज न फेडल्याने नवीन कर्जासाठी ते यंदा अपात्र ठरले आहेत. तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ २८ टक्के इतकेच कर्जवाटप केले आहे. राज्यात सुमारे दीड कोटीहून अधिक खातेदार असून सुमारे ९० लाख शेतकऱ्यांनी बँकिंग यंत्रणेमार्फत एकदा तरी कर्ज घेतले आहे. कर्ज थकलेले असेल तर नवीन पीककर्ज उपलब्ध होत नाही आणि दरवर्षी सुमारे ५५ ते ६० लाख शेतकरी नवीन कर्ज मिळण्यासाठी पात्र असतात. शेतकऱ्यांचे थकीत कर्ज दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दोन वर्षांपूर्वी कर्जमाफी योजना जाहीर केली आणि आतापर्यंत ४३ लाख ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. राज्य सरकारने सुमारे १८ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक निधीचे वाटप या योजनेअंतर्गत केले असल्याची माहिती सहकार खात्याच्या उच्चपदस्थांनी दिली.एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कर्जमाफी दिल्याने ते शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र असतानाही बँकांनी मात्र उद्दिष्टाच्या केवळ ४० टक्के कर्जवाटप केले आहे. १६ लाख ३५ हजार ५५८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँकांची कामगिरी चांगली असून त्यांनी उद्दिष्टाच्या ६४ टक्के इतके कर्जवाटप केले आहे.