|| दिगंबर शिंदे

शेतीचे आर्थिक गणित बिघडले 

सांगली :  गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील पिकांचे सुमारे तीन हजार कोटींचे नुकसान झाले असून बेभरवशाच्या निसर्गामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बिगरमोमसी पावसाने केवळ शेतीच उद्ध्वस्त झाली असे नाही तर मनेही उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. सर्वात जास्त द्राक्ष पिकांची हानी झाली असून पोंगा फुलोरा आणि पक्व झालेल्या अशा सर्वच टप्प्यातील बागांना अवकाळीने जबर फटका दिला आहे. केवळ सहा ते सात तासांत ६० ते ६५ मिलीमीटर झालेल्या पावसाने तोंडचे तर पाणी पळवले आहेच, पण आर्थिक गणितच बिघडले आहे.

राजानं मारलं अन् पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडं मागायची अशी परंपरागत म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. दरवर्षीप्रमाणे ओक्टोबर हिटनंतर थंडीची चाहूल लागते. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला भूमिपूजन केले जाते. या दिवशी शेतकरी शेतात जाऊन शेताची पूजा करून तिथंच आपल्या कुटुंबासमवेत गोडाधोडाचे भोजन करतात. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. पंचमहाभुताबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रघात प्रथेनुसार पाळला जातो. या वेळी घरच्या कारभारणीने घरी रांधलेला स्वयंपाक डालपाटीतून शेतात आणलेला असतो. घरवापसीवेळी रिक्त जाणाऱ्या डालपाटीतून थंडी गावच्या वेशीत येते असे सांगितले जाते. भूमिपूजनावेळी वेशीत आलेली थंडी दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या म्हणजे नरकचतुर्दशी दिवशी उंबऱ्यात येते. यंदा ऐन दिवाळीतच नव्हे तर देवदिवाळी झाली तरी थंडीची चाहूल लागलीच नाही. मात्र, कधी ढगाळ तर कधी चार्र शिंतोडे हे कायम पाचवीलाच पुजले आहे. गेल्या दोन आठवड्यामध्ये कमी अधिक पाऊस झाला. गेल्या आठवड्यात तर पावसाने कहरच केला. पावसाळ्यात ओढे-नाल्यांना येणारा पूर थंडीच्या हंगामात अनुभवण्यास मिळाला.

या वर्षी द्राक्षाचा हंगाम बदलत्या निसर्गचक्रामुळे लांबला आहे. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फळछाटण्या ऑक्टोबरमध्ये सुरू होऊन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण झाल्या. त्यानंतर हवामानात झालेला बदल द्राक्ष शेतीच्या मुळावर उठला आहे. छाटणी झालेल्या बागा पोंगा, फुलोरा अवस्थेत असल्याने या अवस्थेतील बागांना पावसाच्या पाण्याने केवळ धुऊनच नव्हे तर उद्ध्वस्त केले आहे. मणी व घड कुजल्याने बागाच्या बागा मातीमोल झाल्या आहेत. जिल्ह्यात दीड लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक असून यापैकी पन्नास टक्के क्षेत्रावरील क्षेत्र अवकाळीच्या तडाख्यात सापडले आहे.

द्राक्षाची पोंगा फुलोरा अवस्था अत्यंत नाजूक असते. या कालावधीत करपा, दावण्या या बुरशीजन्य रोगांचीही चलती असते. या रोगापासून बचाव करण्यासाठी दिवसातून दोन दोन वेळा औषध फवारणी करण्यात येते. एकावेळी औषध फवारणीचा खर्च किमान तीन हजार रुपये एकरी होतो. यंदाही नाजूक अवस्थेत पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. मात्र अवकाळीच्या दणक्याने होत्याचे नव्हते केले आहे. अवकाळीने मनात जपलेले भविष्याचे केवळ स्वप्नच उद्ध्वस्त झाले नाही, तर पुढच्या पिढीच्या शिक्षणाचा खर्च, काढलेले सोसायटीचे कर्ज, औषधांची उधारी आणि जमलच तर निश्चित केलेला पोरीबाळींचा लग्नाचा बार कसा पार पाडायचा या चिंतेने द्राक्षपट्ट्याला सध्या ग्रासले आहे.

गेली दोन वर्षे करोनामुळे द्राक्ष पिकवूनही बाजारपेठ अपेक्षेप्रमाणे गवसली नाही. यंदा सर्व काही सुरळीत पार पडेल असे वाटत असतानाच लहरी निसर्गाचा फटका बसला आहे. अनेक शेतकरी आता शेतीचा धंदाच नको अशा मन:स्थितीत आला आहे. सततची टांगती तलवार मानेवर घेऊन उघड्या आभाळाखाली मनस्वास्थ्य तर कसे लाभेल. उद्या काही तरी भले होईल ही आशाच आता मावळत चालली असून जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी केवळ हतबलच नाही तर परिस्थितीने गांजला आहे. अशा स्थितीत त्याला धीर केवळ शब्दांनी देऊन वेदना कमी होईल अशी स्थिती नाही. कधी दुष्काळाने होरपळणारा बळीराजा आज अवेळीच्या पावसाने उद्ध्वस्त होऊ लागला असून आता द्राक्षासारखे महागडे पीक घेण्याऐवजी जुंधळ-बाजरी सारखी पिके घेऊन रोज एकाच्या बांधाला जाणेच हितकारक वाटण्यासारखी स्थिती अन्नदात्याची झाली आहे.

अन्य पिकांचेही नुकसान

गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षासारख्या नगदी पिकांचे तर नुकसान झालेच आहे, पण याचबरोबर शाळू, हरभरा, भाजीपाला यांचेही नुकसान झाले आहे. काढणीला आलेला जोंधळाही काळा ठिक्कर पडला असून उरलेली पिकांची थाटंही कडब्यालाही उपयुक्त ठरणारी उरली नाहीत. जिल्ह्यात २९ हजार ८९० एकर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली असल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल सांगतो. आता पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मिळणारी भरपाई ही झालेल्या खर्चाच्या तुलनेत खिजगणतीतही असणार नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने आतबट्ट्यात येणारा शेती व्यवसाय ठोस उपाययोजना केल्या नाही तर शेती उद्ध्वस्त तर होतेच आहे, माणसंही उद्ध्वस्त होतील. 

जिल्ह्यात ३१ हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार विमा घेतला आहे त्यांना  ४० हजार ते दोन लाख ३४ हजार रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळू शकते.-मनोज वेताळ, जिल्हा कृषी अधीक्षक.