येथे २०१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कित्येक कोटींचा निधी खर्च करण्यापेक्षा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी, गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी हा निधी खर्च करावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील बहुसंख्य नीतीमत्ता व नैतिकता न पाळणाऱ्या दिगंबर अवस्थेतील साधुंचा सहभाग असणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनास आपला सक्त विरोध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृतीसह बहुजन समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी संभाजीराजे यांनी २३ नोव्हेबरपासून शिवनेरी किल्ले येथून शिव-शाहू यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या पहिल्या दप्प्यात ते रविवारी येथे आले असता त्यांनी विविध विषयांवरील आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यास सरकारला कोणती अडचण आहे तेच कळत नाही. न्यायालयाच्या निर्देशांमुळे स्वंतत्र आरक्षण देणे शक्य नसले तरी ओबीसींमध्ये मराठय़ांना समाविष्ट केले जाऊ शकते. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील मराठा आरक्षण आढावा समितीकडे आम्ही सकारात्मक दृष्टिने पाहात असून ही समिती आपला अहवाल सरकारपुढे सादर करेपर्यंत तरी थांबा व वाट पहा हे धोरण आम्ही स्वीकारले आहे, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस भावासंदर्भात सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात मत मांडताना त्यांनी कोणत्याही पिकासाठी शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळालाच पाहिजे, परंतु त्यासाठी कायदा हातात घेण्यास आपला विरोध असल्याचे सांगितले.
राज्यातील गड-किल्ल्यांची अवस्था अत्यंत बिकट असून त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. राजगड, रायगड, पुरंदर, पन्हाळा, सिंधुदुर्ग यांसारख्या किल्ल्यांची पुनर्बाधणी करावी, गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यात यावे अशी सूचना करीत त्यांनी गड-किल्ल्यांच्या पावित्र्यास हानी पोहोचविणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.