सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामात सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी दोन कोटी २९ लाख ४८ हजार २९२ मेट्रिक टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे. त्यापोटी एफआरपीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४३८५ कोटी २३ लाख रुपये इतकी रक्कम अदा झाली आहे. आणखी ६०७ कोटी ८७ लाखांची रक्कम साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देय आहे. साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना एकूण ४९९२ कोटी १० लाख रूपये एफआरपीनुसार रक्कम देय आहे. त्यापैकी ८७.८४ टक्के म्हणजे ४३८५ कोटी २३ लाखांची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडली आहे. आणखी ६०७ कोटी ८७ लाख रुपयांची रक्कम साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अदा करावयाची आहे.

अकलूजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक म्हणजे १०३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. तर माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने १०० टक्के रक्कम दिली आहे. गोकुळ माऊली-९८.६० टक्के, गोकुळ-९६ टक्के, विठ्ठलराव िशदे सहकारी साखर कारखाना (पिंपळनेर)-९५ टक्के, भैरवनाथ, विवाळ-९५ टक्के, भैरवनाथ, आलेगाव-९४.५९ टक्के, सीताराम महाराज, खर्डी-९२ टक्के, जकराया व युटोपियन-९१ टक्के याप्रमाणे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना रक्कम अदा केली आहे. तर सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्यासह सांगोला, संत कूर्मदास, ओंकार, लोकमंगल ( भंडारकवठे), विठ्ठल का?र्पोरेशन, बबनराव शिंदे (तुर्क पिंपरी) या साखर कारखान्यांनी ९० टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. सोलापूरच्या सिध्देश्वर सहकार साखर कारखान्याने ८७ टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे.

तर लोकमंगल (बीबी दारफळ)-८६ टक्के, मातोश्री लक्ष्मी शुगर-८४ टक्के, मकाई (करमाळा) व लोकनेते (मोहोळ)- प्रत्येकी ७६ टक्के, भीमा (टाकळी सिकंदर)-७५ टक्के, सिध्दनाथ व इंद्रेश्वर-प्रत्येकी ७४ टक्के, सहकार शिरोमणी वसंतराव काळे-७१ टक्के, विठ्ठल रिफायनरी-६७ टक्के, जय हिंदू व संत दामाजी-प्रत्येकी ६५ टक्के याप्रमाणे एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे.