जालना – अतिवृष्टी, गारपीट इत्यादींमुळे जालना जिल्हयातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत वितरित करण्यात आलेल्या पीकहानी अनुदानात जवळपास ३५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे यासंदर्भातील चौकशी समितीच्या अहवालात समोर आले आहे. यापैकी २३ कोटी ६९ लाख रूपये अनुदान शेती नसणारांना वितरित झालेले आहे.
नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२४ दरम्यानच्या चार शासन निर्णयांद्वारे वितरित झालेल्या या अनुदानाच्या गैरप्रकाराबाबत राज्य शासनाकडे तक्रारी आल्यानंतर यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे .या समितीने दोन तालुक्यांतील अनुदान वितरणाची सांख्यिकीय चौकशी आतापर्यंत केली असून जिल्ह्य़ातील अन्य सहा तालुक्यांची चौकशी सुरु आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी वार्ताहरांना सांगितले की, अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत एकूण ३४ कोटी ९७ लाख ३ हजार ३३४ रुपयांचे अतिप्रदान झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. वितरित झालेल्या ७९ कोटीं पैकी ७२ कोटी रुपयांची तपासणी आतापर्यंत झाली आहे. वितरित झालेल्यापैकी ५ कोटी ७४ लाख रुपये पीकहानी अनुदान शासनाकडे परत करण्यात आले आहे.
अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील संबंधित २६ तलाठी, १७ कृषी सहाय्यक आणि ३१ ग्रामसेवक या संदर्भात दोषी आढळले असून त्यांना खुलासा करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
गैरप्रकाराची पद्धत
शासकीय जमीनीवर शेती दाखविणारांना ३ लाख ४९ हजार रुपये, क्षेत्रवाढ दाखविणारांना १ कोटी १८ लाख रुपये पीकहानी अनुदान वाटप झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. तर जवळपास दहा कोटी रुपयांचे अनुदान दुबार वाटप झाल्याचे चौकशीत समोर आले आहे .