कराड : महाराष्ट्राची धार्मिक, आध्यात्मिक परंपरा अन् वारकरी संप्रदायाचा आनंद सोहळा असलेली आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) विठ्ठलभक्तांनी श्रद्धा अन् भक्तिभावात उत्साहात साजरी केली. येथील प्रसिद्ध संत सखुबाई आणि विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष भक्तांकडून होत होता.कराडच्या कृष्णातीरावरील संत सखुबाई मंदिर आणि भाजी मंडई परिसरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मंगल प्रभात समयी देवांची पूजा-अर्चा, धार्मिक विधी पार पडले. या नंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.संत सखुबाई मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची अक्षरशः रीघ लागली होती. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही गर्दी राहिली होती. दिवसभर भजन, कीर्तन, नामस्मरण असे धार्मिक कार्यक्रम रंगले होते.
यावेळी मंदिर समितीच्यावतीने भाविकांना खिचडी, केळी यासह उपवासाचा प्रसाद वाटप करण्यात आला. अनेक भक्तांनी उपवास करून विठ्ठलाच्या सेवेत स्वतःला अर्पण केले होते. दोन्ही मंदिरात दिवसभर भाविकांची वर्दळ होती. भजन- कीर्तन आणि नामजपाचे कार्यक्रम पार पडले. मंदिर व्यवस्थापनाने दर्शनाच्या योग्य सोयी, स्वच्छता- सुविधा आणि शिस्तबद्ध रांगांचे नियोजन केले होते. या दोन्ही मंदिरांमध्ये साजऱ्या झालेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने कराड शहरामध्ये एक पवित्र भक्तिमय, आध्यात्मिक व उत्साही वातावरण पहावयास मिळाले.
संत सखुची महती
विठ्ठलाची निस्सीम भक्त संत सखू ही विठ्ठलाने तिच्यासाठी घेतलेला अवतार यासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे विठू माउली एकादशीला कराडमध्ये संत सखू मंदिरातच असतात, अशी अनेक भक्तांची धारणा आहे. पंढरपूरजवळ गरीब कुटुंबात जन्मलेल्या सखुबाईंचा विवाह कराडमधील धोंडोबा नावाच्या व्यक्तीशी झाला आणि दुष्ट सासू, सासरा व पतीकडून तिचा प्रचंड छळ होत असे. सखुबाईंना विठ्ठलभक्ती आणि वारीला मुभा नव्हती. एकदा वारीला जाण्याचा तिने प्रयत्न केला म्हणून घरच्यांनी तिला ओढत आणून बांधून ठेवले. या वेळी साक्षात विठुरायाने सखुचे रूप घेतले. सखुबाईंच्या जागी स्वतःला बांधून घेवून सखुंना पंढरपूरला जाण्यास मोकळे केले.
पंढरपुरात विठ्ठल दर्शनावेळी पांडुरंगाच्या ध्यानात रमून गेलेल्या सखुबाईंची समाधी लागली. तर, दुसरीकडे सखूच्या अवतारातील विठ्ठल निमुटपणे तिचे घरचे काम करत होते. त्यांनी दुष्ट सासू, सासऱ्यांचे मनपरिवर्तन करून, त्यांना भक्तीचे महत्त्व पटवून दिले. काही दिवसांनी गावकऱ्यांनी सखुचे अंत्यसंस्कार केले. ते सखूच्या घरी आले. तो काय पाहता सखू घरकाम करत होती. यावर उपस्थितांना पांडुरंगाचे दर्शन अन् चमत्काराची जाणीवही झाली. अशी संत सखू महात्म्याची आख्यायिका आहे.