भारत हा बहुभाषिक व विशाल देश असल्याने सौम्य प्रकारचे काही वादविवाद असणे साहजिक असले तरी देशाला एकात्म ठेवण्यात साहित्याचे योगदान अधिक आहे, असे प्रतिपादन साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीनेदेण्यात येणारा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ कर्णिक यांच्या हस्ते ज्येष्ठ गुजराती कवी, नाटककार व समीक्षक डॉ. सितांशू यशश्चंद्र यांना रविवारी देण्यात आला. त्याप्रसंगी कर्णिक बोलत होते.
एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव प्रकाश अतकरे, सतीश काळसेकर, चंद्रशेखर जहागीरदार, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक श्याम पाडेकर आदी उपस्थित होते. राजकारण्यांवर टीका करताना मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्यामुळे देश विभिन्न होत असल्याचे नमूद केले. देशासाठी सध्या खरी गरज उत्तम भारतीय म्हणून जगण्याची आहे. देशातील विविध पंथ, भाषा एकत्र आणण्याचे काम साहित्याने केले आहे. साहित्यामुळे सहत्व, ममत्व व एकात्म हे घटक निर्माण होतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. यशश्चंद्र यांनी आपण गुजरातमध्ये असताना मराठी शिकलो, तर मुंबईत असताना गुजरातचा अभ्यास केला, असे नमूद करत त्यामुळे आपण गुजराती भाषिक महाराष्ट्रीय व मराठी भाषिक गुजराती आहोत, असा गौरवपूर्ण उल्लेख केला. कुसुमाग्रजांच्या कवितांचा गुजराती भाषेत अनुवाद करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. कन्नड साहित्यिक जयंत कैकिणी, हिंदी साहित्यिक डॉ. चंद्रकांत देवतळे, मल्याळी साहित्यिक के. सच्चिदानंदन यांना याआधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाआधी सकाळी  ‘समकालीन गुजराती कविता’ तसेच ‘समकालीन मराठी कविता’ या विषयांवर परिसंवाद झाले.