जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी थोरात-राष्ट्रवादी आणि विखे गटाचे सगळय़ा जागांवरील उमेदवार अद्यापि निश्चित नाहीत. त्याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान राष्ट्रवादी-थोरात गटाने उद्या (रविवारी) नगरला बैठक बोलावली असून, प्रचाराचे नियोजन या बैठकीत करण्यात येणार असल्याचे समजते. याच बैठकीत या गटाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होते.
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दि. ५ मेला होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. बँकेतील सध्याचे सत्ताधारी राष्ट्रवादी-थोरात गट विरुद्ध विखे गट अशीच ही निवडणूक रंगेल, असे दिसते. सोमवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्याच दिवशी चिन्हवाटपही होणार आहे.
राष्ट्रवादी-थोरात व विखे यांच्यातील युती फिसकटल्यामुळे निवडणुकीत पुन्हा रंग भरला आहे. राष्ट्रवादी-थोरात गटाचे या निवडणुकीवर वर्चस्व असले तरी काही जागांवर चुरशीची चिन्हे आहेत. सेवा संस्थामधील श्रीरामपूर, अकोले, जामखेड येथील लढतींचा त्यात समावेश आहे. श्रीरामपूर येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे विद्यमान संचालक जयंत ससाणे (विखे गट) व इंद्रभान थोरात (राष्ट्रवादी), अकोले येथे बँकेचे विद्यमान संचालक सीताराम गायकर (राष्ट्रवादी) विरुद्ध शिवाजी धुमाळ (संभाव्य विखे गट), जामखेड येथे जगन्नाथ राळेभात व रामचंद्र राळेभात अशा लढती रंगणार आहेत.
सेवा संस्थेच्याच कोपरगाव येथील बिपीन कोल्हे विरुद्ध अशोक काळे या पारंपरिक राजकीय विरोधकांमधील लढतीकडे लक्ष आहे. दोघेही बँकेचे विद्यमान संचालक आहेत. कोल्हे आता भाजपमध्ये आहेत तर काळे राष्ट्रवादीत आले आहेत. जिल्हा बँकेपुरता विचार केला तर दोघेही राष्ट्रवादी-थोरात गटाचे मानले जातात. मात्र काळे यांच्या स्नुषा तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कन्या चैताली काळे यांनी महिला गटातून राष्ट्रवादी-थोरात गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोपरगाव येथील सेवा संस्थेच्या जागेवर काळे-कोल्हे यांच्यात समझोता होऊन त्यावर कोल्हे यांचा दावा मान्य केला जाण्याची शक्यता व्यक्त होते.
याशिवाय बिगरशेती गटात आमदार अरुण जगताप (राष्ट्रवादी) व सबाजी गायकवाड (संभाव्य विखे गट) यांच्यातील लढतीकडेही जिल्हय़ाचे लक्ष आहे. गायकवाड हे गेल्या वेळी थोडय़ा मतांनीच पराभूत झाले होते. महिला गटातील लढतीकडेही सुरेखा कोतकर यांच्यामुळे लक्ष आहे. दोन जागांवर येथे पाच उमेदवार रिंगणात आहेत. एकीकडे नातेसंबध आणि दुसरीकडे नवी राजकीय जुळवणी या पाश्र्वभूमीवर  कोतकर विखे गटाच्या उमेदवार होतात की नाही याबाबत उत्सुकता आहे.