मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या एका मेळाव्याला संबोधित करत असताना देशातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किर्गिस्तानमध्ये होते, म्हणजेच स्वतः परदेशात होते आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करु नका. आपला जीडीपी दर जर चीनपेक्षा चांगला आहे तर मग परदेशात का जायचं नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला आणि कुरळ्या केसांचा एक बाबा आहे म्हणत राज ठाकरेंनी अनिरुद्धाचार्यांची खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
सध्या जे काही वातावरण देशात आहे हे वातावरण तयार केलं जातं आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पाठवलं जातं आहे. प्रवचन वगैरे देणारी मंडळी आहेतच. तो एक कुरळ्या केसांचा एक बाबा आहे ना.. (अनिरुद्धाचार्य) तो नाही असा केस वाढवलेला आहे एकजण. थोडा असा आहे तो. त्याने काय सांगितलं? काहीही स्टोऱ्या सांगतात आणि लोक भाबडेपणाने ऐकतात. त्यादिवशी अशीच त्याने गोष्ट सांगितली. राम आणि रावणाचं युद्ध झालं तेव्हा त्या युद्धात रावणाचे एक लाख पुत्र आणि दीड लाख नातू मारले गेले. मला जे माहीत आहे त्याप्रमाणे रावणाला फक्त दहा तोंडं होती असं राज ठाकरे म्हणाले. एक लाख मुलं? रावण जेवला वगैरे की नाही? काहीही भाकडकथा सांगतात.
अस्त्रालय, ऑस्ट्रेलिया नावावरुनही उडवली खिल्ली
पुढे राज ठाकरे म्हणाले, हा बाबा असं म्हणाला की, राम आणि रावणाचं युद्ध झाल्यानंतर बरीच अस्त्रं पडली होती. रामाने हनुमानाला सांगितलं की दहा हजार किमी लांब ही अस्त्रं ठेवून ये. ती अस्त्रं जिथे ठेवली होती ते अस्त्रालय त्याचं ऑस्ट्रेलिया झालं. असं असेल तर मग न्यूझीलंड, हॉलंड, इंग्लंडचं काय करायचं? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आणि अनिरुद्धाचार्यांची खिल्ली उडवली. हेच सगळं चालू असताना समोर बसलेले लोक शांतपणे ऐकत बसले आहेत. हे देशात काय चाललं आहे? कुठे चाललंय सगळं, आपण कुठे चाललो आहे? याचा विचार करायला पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे आणि अनिरुद्धाचार्यांची खिल्ली उडवली आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “तुम्हाला या सगळ्या गोष्टीत फक्त गुंतवून ठेवायचे आहे. जातीच्या वादात, धर्माच्या वादात गुंतवून ठेवायचे, तुम्ही या वादात गुंतून राहिलेत की बाकीचे प्रश्न विचारायला तुम्ही मोकळे नसतात. देशात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण आज वाढलेले आहे. इतकी भयानक परिस्थिती आता देशामध्ये आहे. हे आता सरकारचे किंवा भारतीय जनता पक्षाचे आंधळेपणाने फॉलो करणारे लोक आहेत, त्यांच्यावर जाऊ नका. कारण ते आता बोलत आहे ते स्वतःची समजूत काढत आहेत. ते बाकी दुसरं काही करत नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले.
