रत्नागिरी : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालून जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी भव्य ‘महाजनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार आहे. पोलीस, बँका आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थेट गावागावांत जाऊन महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह प्रमुख बँक अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारांच्या अत्याधुनिक आणि अत्यंत क्लिष्ट कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. नुकत्याच घडलेल्या एका सायबर गुन्ह्यात ८७ लाख रुपयांची रक्कम अवघ्या दोन मिनिटांत मुंबई आणि तामिळनाडूतील खात्यांमार्फत तब्बल १,४०० विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली. सायबर गुन्हेगारीचे हे वाढते स्वरूप चिंताजनक असून, नागरिकांची सतर्कता हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांना सायबर विमा संरक्षण द्या : तंत्रज्ञानाशी फारसे परिचित नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची पुंजी सायबर फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांनी त्यांच्या खात्यांना सायबर विम्याचे संरक्षण द्यावे. एखाद्या खात्यातून अचानक मोठ्या रकमेचा व्यवहार होत असल्यास बँकांनी तत्काळ खातेदार तसेच पोलिसांना अलर्ट करावे.
नागरिकांची वैयक्तिक, आर्थिक आणि गोपनीय माहिती बँकेच्या माध्यमातून बाहेर फुटणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक असलेली माहिती आणि तांत्रिक सहकार्य पोलिसांना विनाविलंब उपलब्ध करून द्यावे.
सायबर गुन्हेगारीविरोधातील लढाई केवळ पोलिस किंवा प्रशासनापुरती मर्यादित न राहता ती ‘लोकचळवळ’ झाली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने सायबर फसवणुकीच्या पद्धती समजून घेत सतर्क राहिल्यास सायबर भामट्यांना मोठा आळा घालता येईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
‘सतर्क नागरिक, सुरक्षित खाते आणि सायबरमुक्त रत्नागिरी’ या उद्देशाने राबविण्यात येणारी ही महाजनजागृती मोहीम जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीविरोधातील महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
