Cyclone Tauktae : तौक्ते चक्रीवादळ अतितीव्र

केरळ, गोव्यासह कोकणाला तडाखा; मुंबई परिसराला सतर्कतेचा इशारा

केरळ, गोव्यासह कोकणाला तडाखा; मुंबई परिसराला सतर्कतेचा इशारा

पुणे/मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने रविवारी अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. रविवारी या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा दिला. सोमवारी (१७ मे) मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली.

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांमध्ये शनिवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला. रविवारी सकाळी चक्रीवादळ अतितीव्र होऊन त्याचा वेगही वाढला. समुद्रामध्ये सध्या ताशी सुमारे १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. रविवारी संध्याकाळपर्यंत वेगाने चक्रीवादळ पुढे सरकत होते. गोव्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असताना या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पुढे ते दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ सरकले. त्यामुळे या भागात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला होता. याच कालावधीत कोल्हापूर आणि सांगली परिसरातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवला. या भागातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. बहुतांश भागांत विजेचे खांब कोसळले, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. पश्चिम घाट परिसरात सर्वदूर वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला.

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ांतही अतिमुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मुंबई, ठाणे जिल्ह्य़ासाठी सोमवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर येथेही सोमवार आणि मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्य़ांमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सोसाटय़ाचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत साधारण ७० ते ९० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभाग आणि महापालिकेने केले आहे.

या वादळाने शनिवार रात्रीपासूनच मुंबईतील वातावरण बदलून गेले. शनिवारी रात्री आणि रविवारीही मुंबईतील अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने २८.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली होती. मात्र, रविवारी पावसाच्या सरींमुळे किमान आणि कमाल तापमानातही काहिशी घट झाली. रविवारी सांताक्रुझ केंद्राने २६.४ अंश सेल्सिअस किमान तर ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. कुलाबा केंद्राने २७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली.

पोलीस सज्ज

चक्रीवादळामुळे निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना बचावकार्यासाठी सज्ज राहाण्याच्या सूचना आयुक्तालयाने दिल्या. सर्व पोलीस ठाण्यांना रात्रपाळीत अधिकाधिक मनुष्यबळ हाती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालिके चा आपत्कालिन विभाग, अग्निशमन दल, रुग्णालयांशी समन्वय ठेवावा, अशाही सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत. पाणी साचल्यास, वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्यास रुग्णवाहिका, प्राणवायू वाहून नेणारी आणि आरोग्य सेवकांची वाहने खोळंबू नयेत, याची काळजी घ्यावी. करोना रुग्णांसाठी ज्या ठिकाणी प्राणवायू पुरवठा यंत्रणा कायान्वित आहे तेथील सुरक्षा आढावा घ्यावा, असेही पोलीस ठाण्यांना कळविण्यात आल्याचे पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी सांगितले.

जेएनपीटी बंदरावरील जहाजे सुरक्षितस्थळी

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) बंदरातील जहाजांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. जेएनपीटी प्रशासनाकडून शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे कार्य सुरू होते. तसेच परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सर्व जहाजांना बंदरात प्रवेश बंद के ला आहे. वादळामुळे कोणतीही हानी पोहचू नये, यासाठी टर्मिनल्सना त्यांची कार्गो हँडलिंगची साधने आणि इतर उपकरणे सुरक्षित ठेवावीत. टर्मिनलवरील क्रेन टाय-डाऊन करून सुरक्षित ठेवण्यात याव्यात, अशा सूचना बंदर प्रशासनाने यंत्रणांना कळविले आहे. जेएनपीटी ते मुंबई दरम्यानची प्रवासी बोट सेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रत्नागिरीत झाडे, घरांची पडझड

’रत्नागिरी : ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांनी रविवारी रत्नागिरी जिल्ह्य़ातील राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर आणि गुहागर तालुक्यांना मोठा तडाखा दिला. जुन्या वृक्षांसह अनेक झाडे उन्मळून पडली. ’घरे-दुकानांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. या तालुक्यांमध्ये बहुसंख्य ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून तो पूर्ववत होण्यासाठी किमान एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज आहे.

किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतर 

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनारच्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये ३८९६, सिंधुदुर्ग १४४ आणि रायगडमध्ये ५,९४२ जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने  दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cyclone tauktae very severe cyclonic storm likely to intensify further zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली