सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आगीची घटना घडली आहे. सिलेंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण वस्ती जळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीत सिलिंडरच्या टाक्यांचा स्फोटही होत जावून येथील डॉ. बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील २o – २५ घरांची संपूर्ण वस्तीच जळाली. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत सिलिंडरच्या टाक्यांचा एकापाठोपाठ एक असे स्फोट होत राहिल्याने संपुर्ण परिसर हादरून गेला. या वस्तीतील महिलांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक घटनास्थळाकडे धावले. पोलीस, नगरपालिका तसेच शासकीय यंत्रणाही दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, सुदैवाने जिवितहानी झाली नाही.




जिवितहानी झाली नसली तरी या भीषण आगीत जवळपास २५ घरे जळून खाक झाली आहेत. त्यात घरातील संपूर्ण साहित्य, मौल्यवान वस्तु जळाल्या असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या जळीतग्रस्त कुटुंबांना तुर्तास नगरपरिषद शाळा क्रमांक तीनमध्ये निवारा देण्यात आला आहे. कराडचे पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
सध्या ज्या लोकांच्या घरांचं नुकसान झालंय, त्यांच्या घरांच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे.