अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी सीबीआयच्या कोठडी असणारा सचिन अंदुरे याच्याशी पुण्यातील भाजपा नगरसेवक धीरज घाटे यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला आहे. तर, धीरज घाटे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आव्हाड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.


दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सचिन आंदुरे याला सीबीआयने अटक केली असून न्यायालयाने त्याला आठवडाभराची कोठडी सुनावली आहे. या सर्व घडामोडी होत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांचे सचिन आंदुरेशी संबंध असल्याचे ट्विट केले आहे.

दरम्यान, आव्हाड यांनी म्हटले आहे की, जेएनयूमध्ये कन्हैय्याकुमार आणि उमर खलीदच्या मुद्यांवरून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आव्हाड यांनी मार्च २०१५ मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी तेथे सचिन अंदुरे आणि धीरज घाटे सोबत उपस्थित होते. आव्हाड यांच्या ट्विटनंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. यावर घाटे यांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

फर्ग्युसन महाविद्यालयातील त्यावेळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासातून सर्व सत्य बाहेर येईल असे आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना घाटे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि धीरज घाटे यांच्यातील ट्विट युद्धामुळे पुण्याच्या राजकीय क्षेत्रासह सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.