बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सूनेत्रा पवार मागच्या दाराने म्हणजेच राज्यसभेत निवडून येऊन खासदार झाल्या आहेत. राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. राज्यसभेत खासदारून म्हणून निवडून आल्यानंतर आज, (२० जून) पहिल्यांदाच सुनेत्रा पवार बारामतीत गेल्या. बारामतीत गेल्यानंतर एका कार्यक्रमात त्यांना भेटण्यासाठी महिलांची रांग लागली होती. पहिल्याच दिवसांपासून त्यांना लोकांनी विश्वासाने अनेक निवदने दिली असल्याची प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली.

सुनेत्रा पवारांनी महायुतीकडून राज्यसभेसाठी अर्ज भरला होता. त्यांच्याविरोधात कोणीही अर्ज न भरल्याने त्यांची खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली. निवडून आल्यानंतर आज त्या पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाल्या. बारामतीमधील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी दाखल होत त्यांनी जमलेल्या समर्थकांचे आभार मानले. तसंच, जनतेसाठी जे काही करता येईल, त्यासाठी योगदान देण्याचे वनचही त्यांनी दिले.

त्या म्हणाल्या, “राज्यसभेवर निवड झाल्यानंतर मी पहिल्यांदाच बारामतीत आले. मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे आणि जनतेचे आभार मानायचे होते. त्यानिमित्ताने मला त्यांना भेटायचं होतं. यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना भेटून मला आनंद झाला.”

हेही वाचा >> राष्ट्रवादीच्या वाट्याचे राज्यमंत्रीपद कुणाला मिळणार? सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा

खासदार झाल्यानंतर पुढची वाटचाल काय असेल? याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या, “माझी आत्ताशी सुरुवात आहे. जनतेच्या ज्या काही अडचणी असतील, मागण्या असतील, त्यांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिलेली आहे. त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. मला जे योगदान देता येईल ते मी त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करील.”

दरम्यान, सुनेत्रा पवारांना राज्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतु, राज्यमंत्री पदाबाबत त्यांना काहीही माहित नसल्याचं म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

दादा आणि वहिनींवर आमचा विश्वास

एबीपी माझाला मुलाखत देत असताना सुनेत्रा पवारांनी जनतेची कामं करण्याचं वचन दिलं. त्यावेळी त्यांचे काही समर्थक तिथे उपस्थित होते. महिला समर्थकांनीही सुनेत्रा पवारांवर विश्वास दाखवला. त्या म्हणाल्या, “दादा तर कामं करतात आमचे. आज संधी घेऊया वहिनींकडून. दादा आणि वहिनी आमच्या हक्काचे आहेत. ताईंबद्दल आम्हाला १०० टक्के खात्री आहे.”