Nayan Foundation Govinda Pathak : महाराष्ट्रात सर्वत्र श्रीकृष्ण जल्लोषात आणि दहीहंडीच्या उत्साहात नागरिक न्हाऊन निघाले असताना, मुंबईतील दादरमध्ये एक अत्यंत प्रेरणादायी आणि भावूक करणारा सोहळा पाहायला मिळाला. दादर येथील आयडियल येथे नयन फाऊंडेशनच्या दृष्टिहीन गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभाग घेत आपल्या अफाट जिद्दीची आणि आत्मविश्वासाची प्रचिती संपूर्ण मुंबईकरांना दिली. दृष्टी नसली तरी आत्मबळ आणि एकजुटीच्या जोरावर कोणतंही आव्हान पेलता येतं, हे या गोविंदांनी आपल्या कौशल्याने सिद्ध करून दाखवलं.

मुलांचे ४ तर मुलींचे ३ थर: उपस्थितांच्या अंगावर उभा राहिला काटा

दरवर्षीप्रमाणे यंदाही नयन फाऊंडेशनने या विशेष दहीहंडीसाठी सराव केला होता. टाळ्यांचा कडकडाट आणि “गोविंदा आला रे आला”च्या जयघोषात दृष्टिहीन गोविंदांनी शिस्तबद्धरीत्या मानवी मनोरे रचण्यास सुरुवात केली. दृष्टिहीन मुलांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने चार थरांची सलामी दिली, तर दुसरीकडे महिला गोविंदांनीही कुठेही मागे न राहता तीन थरांचा सुरक्षित आणि मजबूत मानवी मनोरा यशस्वीरीत्या उभारला. दृष्टीची मर्यादा असतानाही अत्यंत अचूक समन्वय आणि समतोल साधत रचलेले हे थर पाहून उपस्थितांचे डोळे दिपले आणि सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या गोविंदांचं कौतुक केलं.

नयन फाऊंडेशनचा सामाजिक संदेश

दिव्यांगांना समाजात समान संधी आणि व्यासपीठ मिळावं, या उद्देशाने ‘नयन फाऊंडेशन’ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. केवळ सण साजरा करणं हा यामागचा हेतू नसून, दिव्यांगांमधील सुप्त गुण आणि क्षमता समाजासमोर आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दृष्टी नसतनाही योग्य सराव आणि जिद्दीच्या बळावर दृष्टिहीन व्यक्तीही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, असा सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश या दहीहंडीच्या माध्यमातून समाजाला देण्यात आला.

मुंबईकरांकडून कौतुकाचा वर्षाव

दादरच्या आयडियल येथे उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांनी या अनोख्या दहीहंडीचे साक्षीदार होत गोविंदांवर कौतुकाचा वर्षाव केला. महिला गोविंदांचा आत्मविश्वास आणि मुलांची शिस्त पाहून उपस्थितांचे डोळे भारावून गेले होते. दिव्यांगांच्या या जिद्दीला सलाम करत अनेक मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पथकातील गोविंदांचे मनोबल वाढवले. सामाजिक समानतेचे एक उत्तम उदाहरण म्हणून या गोविंदा पथकाची चर्चा संपूर्ण मुंबईत रंगली आहे.