नगर जिल्ह्य़ातील दलित युवकाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच जालना जिल्ह्य़ातील नानेगाव (तालुका बदनापूर) येथे अंगणवाडी इमारत बांधकामावरून तीन दिवसांपूर्वी बेदम मारहाण झालेल्या मनोज कसाब (३८) या दलित सरपंचाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गावात अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम का करतोस, असे म्हणत नानेगावचे दलित सरपंच मनोज कसाब यांच्यावर ११ जणांनी हल्ला केला. ३ मे रोजी संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यात कसाब जबर जखमी झाले. कसाब हे आपल्या भावासह मोटरसायकवरून जात होते, त्यावेळी हा हल्ला झाला. कसाब यांना उपचारार्थ जालना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या कसाब यांच्या नातेवाइकांनी मृतदेह मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. या हत्येतील सर्व ११ जणांना अटक करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मृतदेह तेथून हलविण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठेक्यावरून वाद
या वादाला राजकीय पाश्र्वभूमीही आहे. अंगणवाडीचा ठेका मिळविण्यावरून सरपंच कसाब आणि आरोपींमध्ये वाद होते. आरोपी गणेश चव्हाण, बाबुराव चव्हाण, उमेश चव्हाण, किशोर चव्हाण, संतोष शिंदे, फ. मुं. चव्हाण, तुकाराम चव्हाण, दिगंबर चव्हाण, बद्री चव्हाण, कृष्णा चव्हाण व बळीराम चव्हाण या ११ जणांनी कसाब यांच्यावर हल्ला चढविला. सोमवारी कसाब यांचे बंधू संदीप यांनी बदनापूर पोलिसांत फिर्याद दिली. सरपंच कसाब शेतकरी संघटनेशी संबंधित होते, तर आरोपी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याच्या माहितीला जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी दुजोरा दिला. सरपंच कसाब व चव्हाण यांच्यात पूर्वीही वाद झाले होते. मात्र, अंगणवाडी व ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामावरून नव्याने वाद चिघळला होता. दुचाकीवरून जाताना सरपंच कसाब यांच्यावर हल्ला करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit murder shock jalna
First published on: 07-05-2014 at 02:14 IST