अवकाळी पावसाने द्राक्षावर मोठय़ा प्रमाणात रोग पसरला असून शेतक-यांना कोटय़वधी रूपयांचा फटका बसला आहे. रविवारी अवकाळीच्या विश्रांतीनंतर उन्हामुळे दावण्याचा प्रादुर्भाव थेट द्राक्षाच्या घडावर झाल्याने अनेक शेतक-यांनी द्राक्ष पीक सोडून दिले आहे. दावण्याच्या तडाख्यातून उरलेले द्राक्ष पीक वाचविणे आíथकदृष्ट्या परवडत नसल्याने यंदाचा हंगाम सोडण्यात येत असल्याचे अनेक शेतक-यांनी सांगितले.
बिगरमोसमी पावसाने गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात थमान घातले असून याचा फटका द्राक्ष आणि डाळिंब या नगदी पिकांना बसला आहे. दावण्यासारख्या बुरशीजन्य रोगाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे आज आढळून आले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. सांगली, मिरजेसह तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्यात पावसाने काल सायंकाळपासून थमान घातले.
द्राक्षाबरोबरच आटपाडी, जत तालुक्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणा-या गणेश डािळबावर बिब्ब्याचे आक्रमण झाले आहे. पक्व  आणि बाजारात जाण्याच्या अवस्थेत असणारे डाळिंब या रोगामुळे झाडावरच फुटू लागल्याने प्रत खालावली आहे. दुस-या बाजूला शिराळा तालुक्यात भाताची सुगी अंतिम टप्प्यात असून कापलेला भात गोळा करण्यापूर्वीच पावसाने आक्रमण केल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यात जमा आहे.
रविवारी सकाळपासून पावसाने पूर्ण विश्रांती घेतली असली तरी द्राक्ष वेलीच्या पानावर पावसाचे थेंब आणि दिवसभराच्या उन्हाचा तडाखा दावण्याला पोषक ठरल्याने शुक्रवार, शनिवारपर्यंत वेलीच्या पानावर दिसणारे दावण्याचे ठिपके आता फुलो-यात असणा-या घडावर दिसू लागले आहेत. हे घड काढून नष्ट करणे एवढेच शेतक-यांच्या हाती असले तरी अवघ्या चार तासांत एकरभर द्राक्ष शेतीवर आक्रमण करण्याची क्षमता असणा-या दावण्याला अटकाव करणे आता हाती राहिले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
पावसामुळे द्राक्षबागेमध्ये पाणी साचले असून काल दिवसभरात पावसाने दिलेल्या उघडीपीचा लाभ घेत शेतक-यांनी केलेली महागडय़ा औषधांची फवारणी सायंकाळच्या पावसाने व्यर्थ ठरविली. ब्ल्यू कॉपर आणि एम-४५ सारख्या भुकटीची धुरळणी पावसाने धुवून काढली. कालच्या एका दिवसात एकरी सुमारे दहा हजार रूपयांच्या औषधांचा चुराडा झाला आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र द्राक्ष पिकाखाली असून त्यापैकी ५० ते ६० टक्के क्षेत्र अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले आहे.