लक्ष्मण राऊत

जून ते सप्टेंबरदरम्यान जिल्ह्य़ात सरासरी ९५० मि. मी. म्हणजे अपेक्षित वार्षिक सरासरीच्या तुलनेत १५८ टक्के पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. कोरडवाहू खरीप पिकांच्या सोबतच बागायती तसेच फळपिकांचे नुकसानही अधिक पावसामुळे झाले.

जिल्ह्य़ातील १७ महसूल मंडळांत तर १००० मि.मी. पेक्षा अधिक तर १५ महसूल मंडळांत ९०० ते १००० मि.मी. दरम्यान पाऊस झाला.

जिल्ह्य़ात खरिपाच्या पेरण्या पाच लाख ५२ हजार हेक्टरमध्ये झाल्या. परंतु जून ते सप्टेंबरदरम्यान अनेकदा अतिवृष्टी झाल्याने यांपैकी दोन लाख ६३ हजार हेक्टरवरील (४७ टक्के) पिकांचे नुकसान झाल्याचा संबंधित शासन यंत्रणेचा अहवाल आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शासकीय पातळीवर झालेले आहेत. त्यानुसार या तीन महिन्यांत एक लाख सात हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यांत पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीने कोरडवाहू खरीप पिकांसोबतच बागायती आणि फळपिकांचे नुकसान झाले. जिल्ह्य़ातील कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने एक लाख ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये एक लाख ५६ हजार हेक्टर कोरडवाहू खरीप, ४४८६ हेक्टर बागायती आणि ७४५० हेक्टर फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.

ढगफुटी तसेच अतिवृष्टीमुळे काही भागात जमिनी खरवडून गेल्या आणि शेतजमिनीत गाळ साचला. त्यामुळे पीकही वाहून जाण्याचा प्रकार बदनापूर तालुक्यात झाला. लहान-मोठय़ा नदी-नाल्यांचे पाणी पिकांत घुसले. त्यामुळे पिके पिवळी पडली. सप्टेंबरमधील पावसाने सोयाबीनला कोंब आले. दमट वातावरणात मूग, उडिदाच्या शेंगांनाही कोंब फुटले. शेतात पाणी साचल्याने अनेक भागांत कापसाची खालच्या भागातील बोंडे भिजून खराब झाली. उसासारख्या बागायती पिकावर दमट वातावरणामुळे आणि उपसा न झाल्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला.

सततचा पाऊस आणि दमट वातावरणामुळे मोसंबीच्या देठाजवळ बुरशीचा प्रादुर्भाव झाला आणि फळगळ झाली. डासांमुळे झाडावरील मोसंबी काळी पडण्याचे प्रमाण वाढले. बुरशी आणि रोगराईमुळे डाळिंबाच्या फळांवर डाग पडून ते खराब झाले. द्राक्षांची छाटणी सप्टेंबरमध्ये पावसामुळे करता आली नाही. उभ्या पिकांमध्ये जेथे अनेक दिवस पाणी साचून राहिले तेथे अधिक नुकसान झाले.

जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सध्या सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबरमधील पिकांच्या नुकसानीचा कृषी विभागाचा अंदाज आणि त्याआधीच्या तीन महिन्यांतील पंचनामे पाहता जिल्ह्य़ात जून ते सप्टेंबर दरम्यान खरीप, बागायती आणि फळपिके मिळून एकूण दोन लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

कमी काळात अधिक पाऊस

* जिल्ह्य़ात खरिपात सर्वाधिक तीन लाख १५ हजार  क्षेत्र कापूस पिकाखाली आहे. त्यापाठोपाठ एक लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.

* या पिकांसोबतच मूग, उडीद आणि पिकांचेही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. जूनमध्ये सोयाबीन बियाणांच्या उगवण शक्तीबद्दलच्या तक्रारी होत्या.

* पुढील काळात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. कमी काळात अधिक पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचण्याचे प्रकार अनेक भागांत घडले.