पालघर जिल्ह्य़ातील शेतकरी संकटात

डहाणू : टाळेबंदीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या संकटात  चक्रीवादळाने भर टाकली आहे. उन्हाळ्यात केलेली भाजीपाला लागवड उद्ध्वस्त झाली आहे.

जिल्ह्य़ातील डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, परिसरात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. वेलवर्गीय भाजी दुधी, कारली, चवळी, घेवडा,  कलींगड,  भोपळा, तसेच मेथी, पालेभाज्या, भेंडी, टोमॅटो, गवार, मिरची आदी भाजीपाल्याची लागवड केली जाते. त्याच्या विक्रीतूनच शेतकरी कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू असतो.

वादळी पावसामुळे भाजीपाला शेतीत जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.   त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याच्याही परिणामाला सामोरे जावे लागले. यावर्षी टाळेबंदीमुळे उन्हाळ्यात हजारो शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळाले आहेत.  कामधंदे बुडाल्याने शेतकऱ्यांनी कसेबसे सावरत पुन्हा भाजीपाल्याची लागवड केली होती. परंतु  पावसाने त्यावर पाणी फेरले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार संकटात सापडले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे  नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.  तालुक्यात  ग्रामसेवक,  तलाठी, कृषी सहाय्यक नुकसानीचे पंचनामे करत आहेत. शेतकऱ्यांनी संयुक्त समितीच्या संपर्कात राहून पंचनामे करुन घ्यावेत.

संतोष पवार, डहाणू  तालुका कृषी अधिकारी