स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी (उदगीर) : विशिष्ट विचाराधारित साहित्यनिर्मिती अतिशय धोकादायक आहे. अशा प्रचारकी साहित्यनिर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. पवार साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

     पवार म्हणाले, राज्यकर्त्यांनी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे ओळखली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेतली आहे. चित्रपट क्षेत्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. हाच  ‘कॉर्पोरेटीकरणा’चा प्रयोग आता साहित्यात होत आहे. तोटय़ातील प्रकाशन संस्था ताब्यात घेतल्या जात आहेत. हे असेच सुरू राहिले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हे टाळायचे असेल तर साहित्यिकांना डोळय़ात तेल घालून दक्ष राहावे लागेल, अशा शब्दांत पवारांनी साहित्यिकांना एका नव्या लढय़ासाठी सज्ज राहाण्याचे आवाहन केले.

पाच वर्षांतून एकदा तरी महिलाध्यक्ष हवी!

साहित्यविश्वातदेखील राजकारणाचा शिरकाव झाला आहे. विशेषत: संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड निवडणूक पद्धतीने सुरू झाल्यानंतर साहित्यिकांच्या अंतरंगात आमच्यातील राजकारणी घुसू लागला आहे. त्याचा अत्याधिक तोटा महिला साहित्यिकांना संभवतो. महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हाव्या, अशी तरतूद असावी. महिला धोरणाचा पुरस्कारकर्ता म्हणून मी येथे उभा राहिलो याची चर्चा साहित्य संमेलनात झाली तर मला आनंदच होईल, असेही पवार म्हणाले. 

साहित्यात संशोधनाची वानवा

साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा जाणवत आहे. इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्किक माहितीच्या आधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वाद-विवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे, असे सांगतानाच पवार यांनी कवितांची पुस्तके आज कमी होत चालली आहेत, अशी खंतही व्यक्त केली. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अर्थकारणाचे गणित जुळत नसल्याने हे घडत असावे, असे ते म्हणाले.