दापोली – रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून दापोली तालुक्यात मोठी कारवाई करत तब्बल ७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून रत्नागिरी पोलीस दलाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला बेकायदेशीर स्फोटक पदार्थांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 2!८ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागात पेट्रोलिंग करत असताना खेड–मंडणगड मार्गावरील मुगीज येथे सायंकाळी सुमारे साडे पाच वाजता संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान प्रकाश राम जगताप (वय ३३ वर्षे) रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थासदृश ७० जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडे आढळलेले स्फोटक पदार्थ सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्यास तत्काळ अटक करण्यात आली असून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२६ अंतर्गत भारतीय स्फोटक कायदा १९०८ चे कलम ५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

